लखनौ : काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांचा कुर्ता धरून एका पोलिसाने त्यांना धक्काबुक्की केल्याबद्दल गौतम बुद्धनगर पोलिसांनी प्रियांका गांधी यांची माफी मागितली असून, याप्रकरणी चौकशीचे आदेशही दिले आहेत. शनिवारी डीएनडी उड्डाणपुलावर हा प्रकार घडला होता.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी हे काँग्रेसच्या इतर नेत्यांसोबत शनिवारी दुपारी हाथरस पीडितेच्या कुटुुंबियांची भेट घेण्यासाठी शनिवारी दुपारी हाथरसकडे जात असताना काँग्रेस कार्यकर्ते आणि गौतम बुद्धनगर पोलिसांदरम्यान झालेल्या झटापटीदरम्यान पोलिसांनी प्रियांका यांना धक्काबुक्की केली. यावेळी हेल्मट परिधान केलेल्या एका पोलिसाने डीएनडी टोल नाक्यावर प्रियांका गांधी यांचा कुर्ता पकडला. अनियंत्रित गर्दी आवरताना घडलेल्या या घटनेबद्दल नोएडा पोलिसांनी खेद व्यक्त केला.
चौकशीनंतर दंडात्मक कारवाई केली जाईल, असेही पोलिसांनी सांगितले. पोलीस उपायुक्तांनी (मुख्यालय) या घटनेची स्वत:हून गंभीरतेने दखल घेत वरिष्ठ महिला अधिकाऱ्यामार्फत चौकशीचे आदेश दिले आहेत. नोएडा पोलीस महिलांचा सन्मान आणि सुरक्षेसाठी कटिबद्ध आहेत, असे जिल्हा पोलीस मुख्यालयाने जारी केलेल्या निवदेनात म्हटले आहे.