नवी दिल्ली : नोटांमुळे कोरोनाचा संसर्ग होतो का, असा प्रश्न वारंवार विचारला जातो. आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) याचे उत्तर दिले आहे. नोटांमुळे कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका आहे, असे आरबीआयने स्पष्ट केले आहे. चलनी नोटांच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारच्या बॅक्टेरिया किंवा व्हायरसचा प्रसार होऊ शकतो, असे आरबीआयने म्हटलंय.
रिझर्व्ह बँकेने कान्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सच्या (सीएआयटी) प्रश्नाला उत्तर देताना नोटांमुळे कोरोना पसरण्याचे संकेत दिले आहेत. सीएआयटीने 9 मार्च रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र लिहिले होते. त्यामध्ये चलनी नोटांमधून व्हायरस पसरतो की नाही, याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. अर्थ मंत्रालयाने हा प्रश्न आरबीआयकडे पाठवला होता. 3 ऑक्टोबर रोजी ईमेलच्या माध्यमातून याचे उत्तर देताना नोटांमुळे विषाणू पसरू शकतो, असे संकेत आरबीआयने दिले आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
यातून वाचण्यासाठी डिजिटल पेमेंट हा पर्याय असल्याचे आरबीआयने सुचवले आहे. कोरोना महामारीचा प्रसार रोखण्यासाठी लोकांनी आपल्या घरांतूनच मोबाईल, इंटरनेट बँकिंग, क्रेडीट- डेबिट कार्डसारख्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून पेमेंट करावे. त्यामुळे चलनी नोटांचा वापर आणि एटीएममधून रक्कम काढण्यापासून वाचू शकतो, असे आरबीआयने म्हटलंय.
* डिजिटल पेमेंटवर सवलत मिळावी
डिजिटल पेमेंट करणा-यांना सवलत मिळावी, अशी मागणी सीएआयटीचे राष्ट्रीय सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांनी केली आहे. डिजिटल व्यवहारावर लावण्यात येणारे शुल्क माफ केले जावे आणि सरकारने बँक शुल्काच्या मोबदल्यात बँकांना थेट सबसिडी द्यावी. सबसिडीचा आरबीआयवर आर्थिक बोजा नसेल. कारण नोटांवर होणारा खर्च कमी होईल, असे प्रवीण खंडेलवाल यांनी म्हटले आहे.