मुंबई : नवी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या आजच्या मराठा आरक्षण परिषदेमध्ये मराठा आरक्षणावरून संभाजीराजे छत्रपती यांनी आक्रमक भूमिका मांडली. तसेच मराठा आरक्षणाच्याबाबत राज्य सरकारने मराठा समाजाला फसवल्याचा गंभीर आरोप केला.
दरम्यान, माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी नवी मुंबईतील माथाडी भवनात बुधवारी मराठा समाजाची राज्यव्यापी बैठक आयोजित केली होती. मराठा आरक्षण परिषदेमध्ये उपस्थितांना संबोधित करताना संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य हे अठरापगड जातींचं होतं. मात्र आज त्यातून मराठा समाज बाहेर का फेकला गेलाय. बहुजनांसाठी शाहू महाराजांनी आरक्षण दिले होते. मात्र आता मराठा समाज आरक्षणापासून वंचित का राहिलाय, असा सवाल करत संभाजीराजेंनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून राज्य सरकारवर टीकेची तोफ डागली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
दरम्यान, मी मराठा समाजाचा नेता नाही तर एक सेवक आहे’ अशी माझी प्रामाणिक भावना आहे. त्यामुळे मी समाजाचा घटक म्हणून समाजाच्या सोबतच बसेन, अशी भूमिका घेऊन बैठकीत सहभागी झालो आहे, असे सांगत संभाजीराजे या बैठकीत सहभागी झाले होते. मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने मराठा समाजाला फसवलं आहे. या विषयाबाबत राज्य सरकारच्या हातात ज्या गोष्टी आहेत त्याही त्यांनी केलेल्या नाहीत. राज्य सरकारने सारथी संस्था बुडवली. अण्णासाहेब पाटील महामंडळाचा राज्य सरकारने खेळखंडोबा केला. सरकार मराठा समाजासोबत किती काळ खेळणार आहे. एमपीएससीमधून ४२७ विद्यार्थी पास झाले. त्यातील १२७ मराठा समाजातील आहेत. त्यांच्या नियुक्त्या रखडल्या आहेत. त्याला जबाबदार कोण? असा संतप्त सवाल त्यांनी केला.
एमपीएससीची परीक्षा परीक्षा होऊ नयेत अशी मराठा समाजाची भावना आहे. मात्र तरीही सरकार परीक्षा देण्याची घाई का करत आहे, असा सवाल विचारत सरकारने ऐकले नाही तर मराठा समाज एमपीएससीचे केंद्र बंद करेल. त्यामुळे राज्य सरकारने कॅबिनेटमध्ये याबाबत निर्णय घ्यावा. असा इशारा संभाजीराजेंनी दिला.
* उदयनराजेंनी फिरवली बैठकीकडे पाठ
या बैठकीला छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज खासदार उदयनराजे भोसले आणि कोल्हापूरचे खासदार संभाजी राजे छत्रपती हे दोघेही एकत्रित उपस्थित राहणार असल्याची माहिती होती; परंतु उदयनराजेंनी यांनी या बैठकीकडे पाठ फिरवली.महिनाभरापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाला देण्यात आलेल्या एसईबीसी आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिली आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात मराठा समाजामध्ये संतापाचे वातावरण पसरलेले आहे.