पाटना : केंद्रीय मंत्री आणि लोकजनशक्ती पार्टी (लोजपा)चे अध्यक्ष रामविलास पासवान यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले. पाटणाच्या दिघा घाटावर त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी मुलगा चिराग पासवान याने मुखाग्नी दिला. मुखाग्नी देताना चिराग चक्कर येऊन पडला. यावेळी उपस्थितांनी त्यास सावरले आणि अंत्यसंस्काराचे कार्य पार पाडले.
तत्पूर्वी पासवान यांच्या पाटना येथील घरापासून त्यांची अंतिम यात्रा काढण्यात आली. यावेळी उपस्थितांचे डोळे पाणावले. ‘रामविलास अमर रहें’ असे नारे यावेळी समर्थकांनी लावले. यानंतर त्यांचे पार्थिव लष्कराच्या वाहनात ठेवण्यात आले आणि दिघा घाट येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
लोक जनशक्ती पक्षाचे (एलजेपी) संस्थापक आणि केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्यावर आज सरकारी इतमामात अंतिम संस्कार करण्यात आले. दिघा घाटावर गंगा किनारी पासवान यांचे पुत्र चिराग पासवान यांनी मुखाग्नी दिला. त्यावेळी शोकाकुल झालेले चिराग हे बेशुद्ध होऊन खाली कोसळले. अखेर नातेवाईकांनी चिराग यांना आधार देत उभे केले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
पासवान यांची अंत्ययात्रा आज दुपारी निघाली तेव्हा मोठी गर्दी झाली होती. वडिलांच्या पार्थिवाशेजारी उभे असलेल्या चिराग पासवान यांच्या डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते. त्यांना सावरणे नातेवाईकांना कठीण जात होते. चिराग यांचे चुलत बंधू खासदार प्रिन्सराज त्यांना आधार देत होते.
निधनानंतर दिल्लीत त्यांचे पार्थिव काही काळ अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह दिल्लीतील बड्या नेत्यांनी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले होतो. पाटणा येथे अंत्यसंस्कारा वेळी मुख्यमंत्री नितीशकुमार, उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी, केंद्रीय मंत्री गिरीराजसिंह, रविशंकर प्रसाद आदी प्रमुख नेते उपस्थित होते.
पाटना येथील श्रीकृष्णपुरी परिसरातील पासवान यांच्या निवासस्थानाबाहेर कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी जमली होती. त्यामुळे पासवान यांची अंत्ययात्रा निघण्यास उशीर झाला. दरम्यान, नितीशकुमार यांच्या मंत्रिमंडळातील कृषीमंत्री प्रेम कुमार यांनी पासवान यांना भारतरत्न देण्याची मागणी केली आहे.