मुंबई : मेट्रो प्रकल्पाची आरे परिसरातील कारशेड कांजूरमार्गला हलवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून त्याची घोषणा केली. यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांनी ‘आरे लढा’ यशस्वी झाल्याचं सांगत राज्य सरकारचे तसंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानले आहेत.
सर्वांनी एकत्र येऊन दिलेला लढा यशस्वी होतो. ‘आरे’च्या लढ्याने हेच सिद्ध केलंय. एका अर्थाने हीच आपल्या लोकशाहीची खरी ताकद आहे, अशी फेसबुक पोस्ट करत ‘आरे’बाबत योग्य निर्णय घेणारे मुख्यमंत्री आणि राज्य सरकार यांचे अमित ठाकरे यांनी आभार मानले आहेत.
आरे आंदोलनावेळी पर्यावरणवाद्यांवर दाखल करण्यात आलेले सर्व गुन्हे मागे घेण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जाहीर केले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
आरेतील जंगलाचे क्षेत्र 600 एकरावरून 800 एकरापर्यंत वाढवण्यात आले आहे. आपण आरेतील झाडे कापून तयार करण्यात आलेले मेट्रो कारशेडचे काम थांबवले आहे. आता मेट्रोची कारशेड कांजूरमार्ग येथे उभारण्यात येईल. मात्र, यामुळे आरेतील कारशेडसाठी आतापर्यंत खर्च झालेला पैसा फुकट जाणार का, असा प्रश्न विचारण्यात येत आहे. परंतु, राज्य सरकार जनतेचा एकही पैसा फुकट जाऊ देणार नाही. आरेत मेट्रोच्या कारशेडसाठी उभारण्यात आलेली इमारत अन्य कामांसाठी वापरली जाणार असल्याचे सांगितले.
अमित ठाकरे म्हणाले, “आपल्या भूमिकांवर जे ठाम असतात, त्यासाठी न थकता, न थांबता संघर्ष करण्याची ज्यांची तयारी असते, तेच अखेर विजयी होतात! मेट्रो कारशेडसाठी ‘आरे’ जंगलाचा- तिथल्या झाडांचा बळी जाऊ नये, यासाठी सातत्याने ज्यांनी सत्ताधाऱ्यांना जाब विचारला, आंदोलनं केली, प्रसंगी तुरुंगवासही भोगला, पण पर्यावरण संवर्धनाचा आपला मुद्दा सोडला नाही, अशा सर्व पर्यावरणप्रेमींना माझा सलाम”.
मेट्रो प्रकल्पाची आरे परिसरातील कारशेड कांजूरमार्गला हलवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. कांजूरमार्गच्या जागेसाठी एका नव्या पैशाचाही खर्च होणार नाही. मेट्रो प्रकल्पासाठी राज्य सरकारने ही जागा मोफत देऊ केली आहे. तसेच आतापर्यंत आरे परिसरातील कारशेडसाठी झालेले बांधकाम आणि खर्चही वाया जाऊ देणार नाही. जनतेच्या प्रत्येक पैशाचा विनियोग राज्य सरकार योग्यप्रकारे करेल, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
* अमित ठाकरेंनी घेतला होता पुढाकार
मेट्रोचं कारशेड बनवण्यासाठी मुंबई महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीने आरे जंगलातील 2 हजार 700 झाडं तोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी अमित ठाकरे यांनी आरेतील झाडे वाचवण्यासाठी पुढाकार घेतला होता. आम्ही विकासाच्या विरोधात नाही, पण निसर्गाचा बळी देऊन विकास करु नये. आपल्या मुंबईवरच नव्हे, तर जगावर ग्लोबल वॉर्मिंगचं संकट आहे. अमेझॉन जंगल पेटल्याने सगळे जण हळहळ व्यक्त करत आहेत. आरे नष्ट करणं ही दुर्दैवी बाब आहे, लोकांनी पुढे येऊन याविरोधात आवाज उठवावा, मी तुमच्यासोबत आहे, अशी भूमिका त्यावेळी अमित ठाकरे यांनी घेतली होती.