मुंबई : भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश निश्चित मानला जात आहे. त्यामुळे एकनाथ खडसेची पुढची भूमिका काय राहणार याकडे लक्ष लागलेले आहे. त्यातच आज जामनेरमध्ये रुग्णालयाच्या उद्घाटनाप्रसंगी खडसे – फडणवीस महाजन एकाच मंचावर एकत्रित येणार होते. परंतु, आपण हजर राहणार नसल्याचे खडसे यांनी आधीच जाहीर केले आणि एकत्र येणे टाळले.
गेल्या काही वर्षापासून आपल्यावर पक्षातंर्गत अन्याय झाल्याची भावना व्यक्त करत एकनाथ खडसेंनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावरच आरोपांच्या फैरी झाडल्या होत्या. तेव्हापासून खडसेंच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशाची चर्चा सुरु झाली आहे. नेमके याच काळात जामनेर येथे गिरीश महाजनांच्या पुढाकाराने उभारलेल्या ग्लोबल महाराष्ट्र हॉस्पिटलचे लोकार्पण आज मंगळवारी फडणवीस यांच्या हस्ते होत असल्याने गिरिश महाजनांनी त्यासाठी खडसेंनाही निमंत्रण दिले होते, त्यामुळे त्याठिकाणी खडसे- फडणवीस भेटीबाबत उत्सुकता लागून होती. मात्र, खडसे यांनी मंगळवारी दुपारीच जामनेरला जाणार नसल्याचे स्पष्ट केले.
* नाराजी दूर होईल, फडणवीसांना आशा
नाथाभाऊंना राजकारण नीट समजते. ते योग्य निर्णय घेतील, असा आम्हाला विश्वास आहे, असं सूचक उत्तर फडणवीस यांनी जामनेर दौऱ्यात दिले. नाथाभाऊ आमचे ज्येष्ठ नेते आहेत. आम्हा सर्वांची इच्छा आहे की, त्यांनी आमच्यासोबत राहिले पाहिजे. नाथाभाऊंना राजकारण देखील नीट समजते. मला विश्वास आहे की, ते योग्य निर्णय घेतील. माझी नाथाभाऊंशी आज कुठलीही चर्चा झालेली नाही. पण, योग्यवेळी चर्चा मी करेन. मला वाटते ते योग्य निर्णय घेतील” असे फडणवीस यांनी आवर्जून सांगितले. यावरुन फडणवीसांना एकनाथ खडसेंचे मन वळवण्याची आशा आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* खडसेंचा फडणवीसांवरील रोष कायम
गेल्या दोन-तीन दिवसांपासून ताणली गेलेली फडणवीस- खडसेंच्या संभाव्य भेटीची उत्सुकता अखेर संपली. एकनाथ खडसे यांनी गेल्या काही महिन्यात देवेंद्र फडणवीसांचे नाव घेत थेट निशाणा साधला होता. मुंबईत झालेल्या भाजप कार्यकारिणी प्रत्यक्ष बैठकीला दांडी मारत खडसे ऑनलाईन सहभागी झाले होते. फडणवीस उपस्थित असल्यामुळेच खडसेंनी हजेरी टाळल्याची चर्चा होती. यावरुनच देवेंद्र फडणवीस यांच्यावर खडसेंचा रोष कायम असल्याचे दिसून येते.
* गुप्त बैठकीलाही खडसेंची दांडी; सुनेची हजेरी
गिरीशभाऊ म्हणजेच भाजप नेते गिरीश महाजन यांनी आपल्याला काल निमंत्रण दिलं होतं. आजही त्यांचा फोन आला, भोजनाचंही निमंत्रण होतं. उत्तर महाराष्ट्रात अशी सुविधा असलेले हॉस्पिटल नाही, जामनेरसारख्या छोट्याशा तालुक्यात एवढे मोठे हॉस्पिटल उभारले जात आहे, यासाठी मी त्यांचे कौतुक केले, अभिनंदन केले, मात्र व्यक्तिगत कारणास्तव उपस्थित राहू शकत नसल्याचं कळवलं, अशी माहिती माध्यमाशी बोलताना दिली. गिरीश महाजन यांच्या निवासस्थानी झालेल्या भाजपच्या गुप्त बैठकीलाही एकनाथ खडसे गैरहजर होते. मात्र खडसेंच्या खासदार सूनबाई रक्षा खडसे या बैठकीला उपस्थित होत्या.