नवी दिल्ली : टाटाच्या ‘तनिष्क’च्या गुजरातमधील शोरूमवर हल्ला झाला आहे. ‘तनिष्क’च्या हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश देणाऱ्या जाहिरातीवरुन मोठा वाद सुरु आहे. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोलिंग झाल्यामुळे ही जाहिरात ‘तनिष्क’ला मागे घ्यावी लागली आहे. गुजरातमध्ये ‘तनिष्क’च्या ज्या शोरूमवर हल्ला झाला, तिथल्या मॅनेजरला जमावाला माफीनामा लिहून द्यावा लागला. एनडीटीव्हीने हे वृत्त दिले आहे.
“ही जाहीरात प्रदर्शित करुन, हिंदूंच्या भावना दुखावल्याबद्दल कच्छ जिल्ह्यातील जनतेची माफी मागतो” असे मॅनेजरने त्या माफीनाम्यात म्हटले आहे. गुजरातच्या गांधीधाममधील ‘तनिष्क’च्या शोरूमवर हा हल्ला करण्यात आला, असे सूत्रांनी सांगितले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
हिंदू सुनेचे डोहाळजेवण तिचे मुस्लीम सासू-सासरे करीत असल्याचे दाखविणारी ही जाहिरात ‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहन देणारी असल्याचा आरोप अत्यंत तीव्रतेने झाल्याने ‘तनिष्क’ने आपली जाहिरात मागे घेतली.
‘एकत्वम’ या नावाने गेल्या आठवड्यामध्ये यू-ट्युब या माध्यमाद्वारे ४५ सेकंदाची ही जाहिरात प्रसारित झाली. मुस्लीम सासू सासऱ्यांकडून मुलीसारखे प्रेम मिळणाऱ्या हिंदूू सुनेच्या डोहाळजेवणाच्या सोहळ्याविषयी सांगणाऱ्या जाहिरातीत या कुटुंबात दोन भिन्न धर्म, संस्कृती, परंपरांचे मीलन झाल्याचे मांडण्यात आले होते.
* काँग्रेसकडून स्वागत तर भाजपाकडून विरोध
काँग्रेसचे खासदार शशी थरूर, अभिनेत्री रिचा चढ्ढा आणि कित्येक मान्यवरांनी हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश देत असल्याबद्दल या जाहिरातीचे प्रचंड कौतुक केले. मात्र भाजप नेत्या कोटापल्ली गीता आणि यांनी त्यावर ट्विटरद्वारे टीका केली. समाज माध्यमांवर ही जाहिरात लव्ह जिहादचे उदात्तीकरण करीत असल्याचा आरोप होऊ लागला. त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून सुरू झालेल्या कटू वादानंतर कंपनीने ही जाहिरात समाज माध्यमांवरून मागे घेतली.