सोलापूर / पंढरपूर : अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रावर अस्मानी संकट कोसळले आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. विठुरायाच्या पंढरपूरनगरीमध्ये पाण्याचा हाहाकार पाहण्यास मिळाला आहे. पंढरपुरातील शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज पंढरपूर तर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार मराठवाडा दौऱ्यावर निघाले आहेत.
अजित पवारही दौऱ्यावर निघाले आहे. अजित पवार हे इंदापूर तालुक्यातील पूरग्रस्त ठिकाणांची पाहणी करणार आहे. त्यानंतर पंढरपूरमध्ये जावून परिस्थितीचा आढावा घेणार आहे. अतिवृष्टीमुळे पश्चिम महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. एकीकडे ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी जोर धरत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे वयाच्या 80 व्या वर्षी उस्मानाबादेत अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाची पाहणी करणार आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मागील 3 दिवसांपूर्वी झालेली अतिवृष्टी, धरणांमधून सोडण्यात आलेले पाणी, यामुळे भीमा नदीची पातळी वाढून नदीकाठी पूरस्थिती निर्माण झाली. अनेक गावांमध्ये पाणी शिरले होते. भीमेच्या रूद्रावताराने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून पंढरपूर शहरात ही अनेक घरं, दुकान पाण्यात होती.
भीमाकाठी माढा, माळशिरस, पंढरपूर, मंगळवेढा तालुक्यात भीमेच्या पाण्यामुळे गुरूवारपासूनच थैमान घातले होते. अनेक गावांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांना प्रशासनाने सुरक्षित स्थळी हलविले आहे. या काळात पंढरपूर तालुक्यात 16 हजार लोकांना स्थलांतरीत करावे लागले आहे. कौठाळीसह अन्यत्र रेस्क्यू टीम पाठवून लोकांना पाण्यातून सोडविण्यात आले. भीमाकाठी झालेली अतिवृष्टी व धरणांचे पाणी यामुळे नदीची पातळी खूपच वाढली होती. मात्र, आता भीमेचा पूर ओसरू लागला आहे.
* बांधकाम विभागाकडून होणार तपासणी
नृसिंहपूर संगम येथील भीमेचा विसर्ग 56 हजार तर पंढरपूरमध्ये नदीचा विसर्ग 2 लाख 13 हजार क्युसेक आहे. पाणी सखल भागातून कमी होऊ लागले आहे. दरम्यान नवीन व अहिल्या पुलावरील पाणी ओसरले असले तरी या पुलांचे तपासणी बांधकाम विभागाकडून केले जात आहे. यानंतर ते वाहतुकीसाठी खुले होतील. गोपाळपूर पुलावर अद्याप पाणी आहे.