उस्मानाबाद : राज्यावर अतिवृष्टीचं मोठं संकट आलं असून यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कधी आलं नाही असं सकंट राज्यावर आलं आहे. या संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी सर्वांनी मदत करण्यासाठी पुढं आलं पाहिजे, असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. उस्मानाबाद येथील तुळजापूरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
सध्या शरद पवार मराठवाड्याच्या अतिवृष्टी झालेल्या परिसराचा पाहणी दौरा करत आहेत. राज्यात भूकंप, अतिवृष्टी किंवा अन्य कुठलंही संकट असो… अशा संकटात शरद पवारच घटनास्थळावर सर्वात आधी कसे पोहोचतात?, असा प्रश्न विचारताच शरद पवार यांनी मला गप्प बसवत नाही म्हणून मी येतो, असं मिश्किल उत्तर दिलं आणि पत्रकारांमध्ये एकच हशा पिकला. राज्यातील जनता स्थानिक पातळी, विधानसभा, लोकसभा अशा सगळ्या ठिकाणी माझ्या पाठीशी ठामपणे उभी राहिली. लोकांचा हा विश्वास माझ्यावर असल्यामुळेच मला स्वस्थ बसवत नसल्याचंही पवार यावेळी म्हणाले.
यावेळी शरद पवार म्हणाले की, अतिवृष्टीमुळे गावपातळीवरील रस्ते खराब झाले त्यासाठी मोठी गुंतवणूक करावी लागणार आहे, अतिवृष्टीचा परिणाम ऊस पिकावरही झाला, आधी कधी आलं नाही असं संकट यंदा राज्यावर आलं. उस्मानाबाद, लातूर, नांदेड, पंढरपूर, इंदापूर, सोलापूर याठिकाणी मोठं नुकसान झालं आहे. अतिवृष्टीमुळे शेतजमिनीचंही मोठं नुकसान झालं,हे नुकसान भरून काढण्यासाठी कर्जाशिवाय पर्याय नाही त्यामुळे लवकरच मुख्यमंत्र्यांना भेटून कर्ज काढण्यास आग्रह करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
‘सुराज्य डिजिटल’ आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, तर मग चॅनल जॉईन करा…फेसबुक पेज, टेलिग्राम, ट्वीटर आणि शेअरचॅटवरही उपलब्ध
तसेच महाराष्ट्रावर ऐतिहासिक आर्थिक संकट आहे. संपूर्ण संकटाचं ओझं एकट्या राज्य सरकारला झेपेल का?, केंद्र सरकारला मदत करावी लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला ही बातमी वाचली, निवडणुकीत आम्ही एकमेकांविरोधात बोलतो, पण अशा संकटावेळी मदत करण्याची भूमिका घेतो, कारण हे राष्ट्रावरील संकट आहे. देशाच्या संकटांना तोंड देण्यासाठी सगळे एकत्र येतो, भाजपा सरकार असताना गुजरातमध्ये भूकंप झाला त्यासाठी माझ्यावर जबाबदारी दिली होती, निर्णय घेताना पक्ष बघितला जात नाही, संकटग्रस्त माणसांना त्यातून बाहेर कसं काढता येईल यासाठी सगळेच प्रयत्न करूया असंही शरद पवार म्हणाले.
* ५३ वर्षात एकही सुटी नाही
५३ वर्षात विधानसभा, लोकसभा, राज्यसभा यात मी काम केलं त्यात एकही दिवस लोकांनी सुट्टी दिली नाही, त्यामुळे लोकांच्या संकटकाळात त्यांच्या मदतीला जाणं माझं कर्तव्य आहे. ज्यांच्या हातात सत्तेचा कारभार असतो त्यांना अनेक ठिकाणी लक्ष द्यावं लागतं, त्यामुळे मुंबईत एकाठिकाणी राहून सगळ्या जिल्ह्यांशी संपर्क साधून निर्णय घ्या अशी विनंती आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केली होती, आम्ही सगळे नेते, इतर मंत्री फिल्डवर फिरत आहोत, त्याचा आढावा आम्ही त्यांना देत असतो. एका जागेवर बसून प्रशासनाचे नियोजन करून निर्णय घ्यावे लागतात असं सांगत शरद पवारांनी मुख्यमंत्री मुंबईबाहेर पडत नाही यावर प्रश्नावर उद्धव ठाकरेंची पाठराखण केली.