बीड : भ्रष्टाचाराच्या प्रकरणात गाजत असलेल्या वैद्यनाथ बँकेचे चेअरमन अशोक जैन यांना तब्बल दहा लाखांची लाच घेतांना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले आहे. या घटनेने बीड जिल्ह्यासह राज्यात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे बँकेच्या कारभाराला गालबोट लागले आहे.
आज अशोक जैन यांच्या परळी येथील राहत्या घरी औरंगाबाद लाच लुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून धाड टाकली तेव्हा हा संपूर्ण प्रकार समोर आला. या प्रकरणी परळी पोलीस ठाण्यात जैन यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. वैद्यनाथ सहकारी बँकही भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या ताब्यात आहे.
‘सुराज्य डिजिटल’ आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, तर मग चॅनल जॉईन करा…फेसबुक पेज, टेलिग्राम, ट्वीटर आणि शेअरचॅटवरही उपलब्ध
वैद्यनाथ बँकेने कळंब येथील बँकेच्या एका सभासदाला अंदाजे अडीच कोटी रुपयाचे कर्ज प्रकरण मंजूर केले असल्याचे समजते. आणि त्या प्रकरणी चेअरमन अशोक जैन याने 15 लाख रुपयांची लाच मागितली होती. त्यामुळे तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. त्यानंतर आज 15 लाखांच्या रक्कमेपैकी 10 लाख रूपये आज दुपारी 2 वाजेच्या सुमारास चेअरमन अशोक जैन यांच्या निवासस्थानी देण्याचे ठरले होते.
ठरलेल्या वेळेनुसार, तक्रारदार 10 लाखांची रक्कम घेऊन अशोक जैन यांच्या घरी पोहोचला. त्यावेळी औरंगाबाद येथील लाच लुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी अचानक धाड टाकली. यावेळी 10 लाखांची लाच घेत असताना अशोक जैन यांना रंगेहात पकडण्यात आले.