मुंबई / जळगाव : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा रंगली होती. पण, अखेर आता एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची तारीख ठरली आहे. फक्त एकनाथ खडसेच नाहीतर त्यांची कन्या रोहिणी खडसे या सुद्धा राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे.
एकनाथ खडसे हे 22 ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत खडसे यांचा प्रवेश होणार आहे. मुंबईतील प्रदेश कार्यालयात हा प्रवेश सोहळा संपन्न होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
एकनाथ खडसे यांच्या जाण्यामुळे भाजपला धक्का बसणार आहे हे निश्चित आहे. पण खडसे यांच्या कन्या आणि जळगाव जिल्हा बँक अध्यक्ष रोहिणी खडसे या सुद्धा राष्ट्रवादीत प्रवेश करून दुसरा धक्का देणार आहे. एवढंच नाहीतर एकनाथ खडसे यांच्याकडून त्यांच्या समर्थकांना 22 ऑक्टोबरला 10 वाजता राष्ट्रवादी कार्यालयात येण्याचं आवाहन सुद्धा केले आहे, अशी माहिती समोर आली आहे.
विशेष म्हणजे, शरद पवार यांनी सोमवारीच एकनाथ खडसे यांच्या पक्षप्रवेशाबद्दल सूचक विधान केले होते. ‘एकनाथ खडसे विरोधीपक्ष नेते होते. राज्याचे अर्थमंत्री होते. एक नेता म्हणून खडसे यांचे मोठे योगदान आहे. ते आम्ही पाहिले आहे. आणि त्यामुळे त्याचं कर्तृत्व, जबाबदारी आम्ही पाहिले आहे. त्यामुळे राजकीय निर्णय काय घ्यायचा आहे, तो त्यांना पाहावा लागणार आहे, असं पवार म्हणाले होते. त्यामुळे राष्ट्रवादीकडून निर्णय झाला आहे, फक्त खडसेंच्या निर्णयाची औपचारिकता बाकी होती. अखेर त्यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे.
* रोहिणी खडसेंच्या विश्वासू कार्यकर्त्याने दिली माहिती
एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादी प्रवेश आणि त्याची तारीख याबद्दल खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांच्या विश्वासू कार्यकर्त्याने माहिती दिली आहे. ‘एकनाथ खडसे हे 22 ऑक्टोबरला राष्ट्रवादीत प्रवेश करतील. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत प्रदेश कार्यालयात हा सोहळा होईल. एकनाथ खडसे आणि त्यांच्या कन्या जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे यादेखील राष्ट्रवादीत दाखल होतील. समर्थकांना सकाळी 10 वाजता राष्ट्रवादी कार्यालयात येण्याचं आवाहन करण्यात आलं आहे,’ असं या कार्यकर्त्याकडून सांगण्यात आलं आहे.
* खडसेंना शुभेच्छा देण्यासाठी झुंबड
भाजपचे उत्तर महाराष्ट्रातील दिग्गज नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादी प्रवेश आता जवळपास निश्चित झाला आहे. कारण मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसे यांच्या समर्थकांनी पोस्टरबाजी सुरू केली असून त्यावरून कमळाचे फूल गायब झालं आहे. तसंच ‘नाथाभाऊ तुम्ही बांधाल तेच तोरण, तुम्ही ठरवाल तेच धोरण’ असं म्हणत खडसेंच्या नव्या राजकीय वाटचालीला शुभेच्छाही दिल्या आहेत.
एकीकडे, खडसे समर्थकांनी राष्ट्रवादी प्रवेशासाठी मुंबईत दाखल होण्याची तयारी सुरू केली असतानाच दुसरीकडे जळगावातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आपला मोर्चा खडसे यांच्या निवासस्थानाकडे वळवला आहे. खडसे यांच्या घरी येत राष्ट्रवादीची कार्यकर्ते त्यांना पक्षप्रवेशासाठी शुभेच्छा देत आहेत.