सोलापूर : राज्यात परतीच्या पावसाने घातलेल्या धूमशानामुळे शेतीसह इतर मालमत्तेचं प्रचंड नुकसान झालं आहे. यानंतर अनेक नेते नुकसानग्रस्त भागांचा दौरा करत आहेत. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी देखील सोलापूरचा दौरा करून परिस्थितीचा आढावा घेतला.
यानंतर, त्यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार प्रहार करताना त्यांची जीभ घसरली.
‘केंद्र सरकार हे राज्य सरकारहुन वाईट आहे. हिंदीमध्ये कवाडी म्हणतात तसे पंतप्रधान आहेत. दारुड्या जसं पैसे मिळाले नाही कि पत्नीला मारतो आणि मग त्याच्या लक्षात आलं कि बायकोकडे काही शिल्लक राहिलेलं नाही. मग तो घरातलं सगळं सामान विकतो. अन तेही संपलं की तो मग घरच विकतो. मोदी या देशातला पंतप्रधान नसून हा दारुडा आहे आणि म्हणून इथलं अख्ख विकायला निघाला आहे’ असा एकेरी उल्लेख करत त्यांनी टीकास्त्र सोडलं आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
अतिवृष्टीच्या मुद्द्यावरून राज्य सरकार आणि भाजपने राजकारण थांबवावं. टोलवाटोलवी बंद करावी. आधीच लोक कोरोनाने त्रासलेले आहेत. उद्ध्वस्त झालेले आहेत. त्यामुळे शेतक-यांना दिलासा द्या. मदत द्या. शेतक-यांच्या असाह्यतेवर राजकारण करू नका, असा सल्ला वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी सोलापुरातील पत्रकार परिषदे दरम्यान दिला.
मुख्यमंत्र्यांनी नुकसानग्रस्त भागात जाणे म्हणजे एक प्रकारचा दिलासा असतो. मुख्यमंत्र्यांनी एकाच जिल्ह्यात जाऊ नये, अनेक ठिकाणी नुकसान झालं आहे, लवकरात लवकर सरकारने मदत केली पाहिजे. मात्र, तीन पायांच्या या सरकारमधील एक पाय मदत जाहीर करू नये म्हणून दुसऱ्यावर दबाव टाकत असल्याचा मला वास येत असल्याची टीका देखील आंबेडकरांनी यावेळी केली.