मुंबई : राष्ट्रवादीत प्रवेशानंतर एकनाथ खडसे यांच्यावर पक्ष संघटनेची मोठी जबाबदारी सोपवण्यात येणार असल्याची माहिती आहे. एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर त्यांच्यासोबत कोण-कोण राष्ट्रवादीमध्ये येणार याची उत्सुकता आहे. खडसे यांच्या प्रवेशामुळे उत्तर महाराष्ट्रामधील अनेक नेते राष्ट्रवादीमध्ये दाखल होण्याची चिन्ह आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
गेले कित्येक दिवस भाजपचे नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा होती ती आज संपुष्टात आली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
एकनाथ खडसे यांनी सर्व चर्चांना विराम देत आपण राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे आज जाहीर केले आहे. त्यांनी भाजपच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे.
एकनाथ खडसे हे कन्या रोहिणी खडसे यांच्यासह राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे. शुक्रवारी 23 ऑक्टोबरला प्रवेश करणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत प्रदेश कार्यालयात हा सोहळा होईल. एकनाथ खडसे आणि त्यांच्या कन्या जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे यादेखील राष्ट्रवादीत दाखल होतील. त्यामुळे खडसे समर्थकांना सकाळी 12 वाजता राष्ट्रवादी कार्यालयात येण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
* एकनाथ खडसेंवर भाजपात अन्याय
एकनाथ खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. शुक्रवारी त्यांचा प्रवेश होईल असं पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाचं स्वागत केलं आहे. शुक्रवारी दुपारी 2 वाजता राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात त्यांचा प्रवेश होणार आहे.
आज एकनाथ खडसे यांनी फोन करून भाजपचा राजीनामा दिल्याचं पाटील यांनी सांगितले आहे. त्यामुळे त्यांचं राष्ट्रवादीत आम्ही स्वागत करत आहोत, असं जयंत पाटील म्हणाले.
भाजपचे काही आमदारही राष्ट्रवादीत येण्याच्या तयारीत आहेत. ते कोरोनाचा काळ संपल्यानंतर येतील असं पाटील यांनी सांगितलं आहे.
खडसेंवर भाजपमध्ये अन्याय झाला आहे, असं जयंत पाटील यांनी म्हटलंय. एकनाथ खडसे पक्षात आल्याने राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढेल, असंही पाटील यांनी म्हटलंय.
खडसे यांनी पक्षात येण्यासाठी कुठलीही अट ठेवली नसल्याचं पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे.
* पक्षासाठी ही चिंतनाची बाब – सुधीर मुनगंटीवार
पक्षासाठी ही चिंतनाची बाब आहे, खडसेंसारख्या नेत्याने पक्षाची 40 वर्षं सेवा केली आहे. त्यांनी जाऊ नये असं मला सतत वाटायचं,” अशी प्रतिक्रिया भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. हे धक्कादायक आणि दुःखद आहे, त्यांच्या मनात खंत होती, माझ्यावर अन्याय होतोय असं त्यांना वाटायचं, तो चर्चेतून संपेल असं वाटायचं,” असंही मुनगंटीवार यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटलंय.