पाटणा : बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजत असताना आयकर विभागाने पाटणामध्ये काँग्रेसच्या कार्यालयावर धाड टाकली आहे. यावेळी आयकर विभागाला या परिसरात लावलेल्या एका कारमध्ये 8 लाख रुपये सापडले आहेत. आयकर विभागाने टाकलेल्या या धाडीची कारवाई जवळपास 1 तास सुरु होती.
आयकर विभागाने काँग्रेसचे नेते रणदीप सुरजेवाला आणि बिहारचे प्रभारी शक्ति सिंह गोहिल यांची चौकशी केली आहे. आयकर विभागाने काँग्रेसच्या कार्यालयावर याबाबत नोटीसही लावली आहे. काँग्रेसचे बिहार प्रभारी शक्ति सिंह गोहिल यांनी या प्रकरणावर बोलताना संबंधित पैसे कुणाचे आहेत याविषयी माहिती नसल्याचं म्हटलं आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
या प्रकरणी आयकर विभागाने एका व्यक्तीला पकडलं आहे. त्याने हे पैसे पाटणात कुणाला तरी देण्यास सांगण्यात आल्याची माहिती दिली. आयकर विभागाने या संपूर्ण प्रकरणावर काँग्रेसकडेही स्पष्टीकरण मागितलं आहे. तसेच हे पैसे कोठून आले आणि कोणत्या नेत्याने अटक करण्यात आलेल्या व्यक्तीला पैसे दिले, असे प्रश्न विचारले आहे.
* काँग्रेस मुख्यालयात धाड नाही
शक्ति सिंह गोहिल यांनी या प्रकरणी आयकर विभागावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, ‘आयकर विभागाला काँग्रेसच्या मुख्यालयात नाही, तर परिसराच्या बाहेर उभ्या असलेल्या एका गाडीत पैसे मिळाले आहेत. तरीही काँग्रेसला नोटीस देण्यात आली आहे. असं असलं तरी आम्ही तपासाला सहकार्य करु. रक्सोलमध्ये भाजपच्या उमेदवाराकडे 22 किलो सोने, 2.5 किलो चांदी सापडली आहे. आयकर विभागाने तेथे कारवाई का केली नाही, असाही सवाल गोहिल यांनी उपस्थित केला आहे.