मोहोळ : मोहोळ नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित इमारतीसाठी आज गुरुवारी घेण्यात आलेल्या विशेष ऑनलाईन बैठकीमध्ये रेल्वे स्टेशन रस्त्यावरील असलेल्या आठवडा बाजार परिसरात इमारत बांधावी असा ठराव मंजूर झाला.
यासाठी ८ सदस्यांनी मतदान केले. तर ती इमारत आहे या ठिकाणीच राहावी या बाजूने ५ सदस्यांनी मतदान केले. तर उपनगराध्यक्षासह चार नगरसेवकांनी या बैठकीस अनुपस्थित राहिल्याने आठ जणांच्या बहुमताच्या जोरावर ही इमारत आठवडा बाजार परिसरात बांधण्यासाठी मंजुरी देण्यात आली.
२०१५ मध्ये नव्याने स्थापन झालेल्या नगर परिषदेचा कारभार आजही जुन्या ग्रामपंचायतीच्या इमारतीतच चालत आहे. ती इमारत नगर परिषदेच्या कारभारासाठी अपुरी पडत आहे. त्यामुळे नवीन इमारत बांधण्यात यावी, यासाठी मागील बैठकीत सत्ताधाऱ्यांनी शहरातील चार जागा सुचविल्या होत्या. परंतू त्या चार जागेपैकी आठवडा बाजार येथील जागा नगरपरिषदेच्या मालकीची व प्रशस्त असल्याने, त्या जागेत इमारत बांधण्याबाबत सत्ताधारी नगरसेवकांनी निर्णय घेतला असल्याचे लक्षात घेऊन शिवसेनेच्या नगरसेवकांनी विरोध दर्शविला होता.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
आजच्या ऑनलाइन पद्धतीने विशेष बैठक घेण्यात आली. या झालेल्या बैठकीमध्ये आठवडा बाजारांमध्ये ही इमारत बांधण्याबाबत नगराध्यक्ष शाहीन शेख, माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर, सरिता सुरवसे ,शौकत तलफदार, नगरसेविका मनीषा फडतरे ,सुवर्णा गाढवे, नगरसेवक दत्तात्रय खवळे ,संतोष खंदारे आदी राष्ट्रवादी आघाडीच्या ८ सदस्यांनी सदरची इमारत आठवडा बाजारात बांधावी यासाठी मतदान केले तर ती इमारत आहे त्याच ठिकाणी रहावी यासाठी शिवसेनेच्या महादेव गोडसे, सीमाताई पाटील, नसीमा बोंगे, अनिता सोनटक्के, राणी गोडसे या पाच सदस्यांनी मतदान केले. राष्ट्रवादीचे उपनगराध्यक्ष प्रमोद डोके, नगरसेविका अर्चना वायचळ, नगरसेवक सुशील क्षीरसागर व अतुल गावडे हे चार नगरसेवक गैरहजर राहिले. त्यामुळे या बैठकीत ८ विरुद्ध ५ मतांनी इमारत आठवडा बाजारात नेण्यासाठी मंजुरी घेण्यात आली आहे.
मागील बैठकीत नगरपरिषदेच्या नवीन इमारतीसाठी चार जागा सुचवण्यात आल्या होत्या. त्यामध्ये इतर जागेवर महाराष्ट्र शासनाचे नाव असल्याने व आठवडा बाजारातील ही खुली जागा नगरपरिषदेच्या नावे असल्याने आलेला निधी परत जाऊ नये म्हणून सर्वानुमते आठवडा बाजारातील जागा निश्चित केली असल्याचे नगराध्यक्षा शाहीन शेख यांनी सांगितले.