मुंबई : अतिवृष्टीमुळं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय होणार असं महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं. पण गुरुवार पाठोपाठ आज शुक्रवारी होणारी मंत्रिमंडळ बैठकही रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे अतिवृष्टीने पिचलेल्या शेतक-यांना कधी मदत मिळणार, आणखी किती वाट पाहायची, असा सवाल करण्याची वेळ आली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित राहू शकत नसल्यामुळं ही बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी अजून किती वाट पाहावी लागणार? असा प्रश्न विरोधकांसह शेतकऱ्यांकडून विचारला जात आहे. अशा स्थितीत अतिवृष्टीमुळं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आता मदतीसाठी आठवडाभर वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांना ताप आल्यानं ते होम क्वारंटाईन झाले आहेत. त्यांची कोरोना चाचणी मात्र निगेटिव्ह आली आहे. मंत्रिमंडळ बैठकीला अजित पवार उपस्थित राहू शकत नसल्यामुळं ही बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. दरम्यान, अजित पवार हे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीला उपस्थित राहू शकतात अशी चर्चा काल सुरु होती. पण आता ही बैठकच आठवडाभरासाठी रद्द करण्यात आली आहे. त्यामुळं मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात झालेल्या अतिवृष्टीमुळं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आता मदतीसाठी अजून आठ दिवस वाट पाहावी लागणार आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोलापूर पाहणी दौऱ्यावेळी गुरुवारी मंत्रिमंडळ बैठकीत या विषयावर चर्चा करुन शेतकऱ्यांना दिलासा देऊ, असं आश्वासन महसूलमंत्री थोरात यांनी दिलं होतं. पण गुरुवारी होणारी बैठक रद्द करण्यात आली. त्यानंतर ही बैठक शुक्रवारी म्हणजे आज होणार असं सांगण्यात आलं. पण आज होणारी मंत्रिमंडळ बैठकही आता आठवड्याभरासाठी पुढे ढकलण्यात आल्याची माहिती मिळतेय.