पुणे : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांना आज बुधवारी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. रक्तदाब वाढला असल्याने त्यांना उपचारासाठी दाखल करून घेण्यात आलं.
राजू शेट्टी यांना गेल्या महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्यांना ९ सप्टेंबर रोजी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. कोरोनावर मात केल्यानंतर आठवड्याभराने ते घरी परतले होते. त्यानंतर त्यांनी काही दिवस घरी विश्रांती घेतली होती. दरम्यान त्यांची प्रकृती स्थिर असून सुधारणा होत असल्याने काळजीचं कारण नसल्याचं त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितलं आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
गेले दोन दिवस ते शेतकरी प्रश्नांसाठी दिल्ली येथे आंदोलनात सहभागी झाले होते. बुधवारी सकाळी ते पुणे येथे दाखल झाले. नेहमीच्या तपासणीसाठी सायंकाळी चार वाजता ते डॉक्टरांना भेटणार होते. तर दुपारी बारा वाजता ते पत्रकारांशी संवाद साधणार होते.
मात्र सकाळी त्यांचा रक्तदाब वाढल्याने आणि दम लागत असल्यामुळे त्यांनी डॉक्टरांची भेट घेतली. त्यांची तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला. त्यानुसार राजू शेट्टी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल झाले असून तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असून काळजीचे काही कारण नाही, असे निकटवर्तीयांनी सांगितलं आहे.