मुंबई : कलर्स वाहिनीवर सुरु असलेल्या बिग बॉस रिअलिटी शोमध्ये प्रसिद्ध गायक कुमार सानूचा मुलगा जान कुमार सानूनं मराठी भाषेबद्दल मानहानीकारक वक्तव्य केल्यानं संताप व्यक्त केला जात आहे. मराठी भाषेचा अपमान करणाऱ्या जान कुमार सानू ला बिग बॉसमधून हाकला, अन्यथा शो चालू देणार नाही, असा इशारा शिवसेनेने दिला आहे. सर्वत्र टीका होत आहे.
सध्या जान कुमार सानूचं वक्तव्य मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून अनेकांनी त्याच्या वक्तव्याबाबत संताप व्यक्त केला आहे. “माझ्याशी मराठीत बोलायचा प्रयत्न करू नको. बोलायचे असल्यास हिंदीत बोल. मला मराठी ऐकून चीड येते,” असं जान कुमार सानू म्हणाला होता. दरम्यान, यानंतर शिवसेना नेते सरनाईक यांनी जान सानूला बिग बॉसमधून वगळण्याची मागणी केली आहे.
“बिग बॉस या मालिकेचे शूटिंग महाराष्ट्रात होते. मराठी लोकांमुळे टीआरपी वाढतो त्याच महाराष्ट्राच्या मराठीचा अवमान मालिकेतल्या जान कुमार सानूने केला हे कदापि खपवून घेणार नाही. महाराष्ट्रात करियर घडवलेल्या गायक कुमार सानूचा मुलगा मराठीचा द्वेष व अनादर करत असेल तर हे सहन केले जाणार नाही,” असं सरनाईक म्हणाले. जान कुमार सानूनं अत्यंत चुकीच्या पद्धतीनं आरडोओरडा करत मराठी भाषेचा अवमान केला आहे. त्याबाबत जर कलर्स वाहिनीनं मुजोर जान सानूची हकालपट्टी केली नाही तर सेटवर येऊन शिवसेना आपल्या पद्धतीनं आंदोलन करेल, असा इशाराही त्यांनी वाहिनीला दिला आहे. याव्यतिरिक्त मराठी भाषेबद्दल प्रेम असलेल्या सलमान खाननंदेखील अशा स्पर्धकांना त्याच्या भाषेत समज द्यावी, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
कलर्स चॅनेल आणि जान सानूने 24 तासाच्या आत जर शो मध्ये माफी मागितली नाही तर बिग बॉसची शूटिंग बंद पाडू असा, इशारा मनसेचे अमेय खोपकर यांनी दिला आहे. जान सानूचं थोबाड फोडून आम्ही त्याला धडा निश्चित शिकवू आणि याला भविष्यात इंडस्ट्रीत काम कसं मिळतं हे ही पाहू, असंही खोपकर यांनी इशारा दिला आहे. मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, जान कुमार सानू… मराठी भाषेची याला चीड येते म्हणे. अरे तू कीड आहेस मोठी… मुंबईतून हाकलून देण्यासाठी याला मी नॉमिनेट करतोय, असं अमेय खोपकर यांनी म्हटलं आहे.
बिग बॉसचा १४ वा सीझन सुरू आहे. या सीझनमध्ये स्पर्धकांमध्ये रोज नवनवे वाद पाहायला मिळत आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राहुल वैद्य, जान कुमार सानू आणि निक्की तांबोळी यांच्या वाद सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. या वादादरम्यान राहुल वैद्यला बोलताना जान कुमार सानू यानं मराठी भाषेबद्दल काही आक्षेपार्ह शब्द उच्चारले. दरम्यान, हा भाग प्रकाशित झाल्यानंतर जान कुमार सानूच्या वक्तव्याचा सर्वच स्तरातून निषेध केला जात आहे. शिवसेना नेते आदेश बांदेकर यांनीदेखील बिग बॉस व्यवस्थापनानं आणि जान कुमार सानूनं महाराष्ट्र आणि मराठी जनतेची माफी मागितली पाहिजे अशी मागणी केली आहे.