मुंबई : राज्यात एकहाती शिवसेनेचा भगवा फडकवण्यास सज्ज राहा, आत्तापासूनच तयारीला लागा असे आदेश शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना दिले आहेत. शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांच्या बैठकीत ते बोलत होते. काल मंगळवारी रात्री उशिरापर्यंत उद्धव ठाकरे आणि जिल्हाप्रमुखांची बैठक सुरु होती, रात्री १० वाजता सुरु झालेली बैठक तब्बल १ वाजता संपल्याचे वृत्त आहे.
व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सुरु असलेल्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी जिल्हाप्रमुखांना मार्गदर्शन केले. या बैठकीत जिल्हाप्रमुखांनी उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यातील भाषणाचं कौतुकही केले. जिल्हाप्रमुखांनी जिल्ह्याच्या विकासासाठी काम करावं, सध्या आर्थिक निधीची कमतरता आहे मात्र लवकरच यावत तोडगा काढू असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी जिल्हाप्रमुखांना दिला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
कोविड काळात राज्य सरकारने केलेली काम जनतेपर्यंत पोहचवा. शिवसेनेच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याला ताकद देण्यात येईल असं उद्धव ठाकरेंनी सांगितले.
दरम्यान, दसरा मेळाव्यावेळी ऑनलाइन भाषण करताना उद्धव ठाकरेंनी भाजपाचा खरपूस समाचार घेतला होता. माय मरो पण गाय वाचो, असं आमचं हिंदुत्व नाही. इथं गोमाता आणि शेजारच्या गोव्यात खाता. असं आमचं हिंदुत्व नाही. पण घंटा बडवा, थाळ्या वाजवा इतकंच तुमचं हिंदुत्व आहे. फक्त काळ्या टोप्या घालू नका, त्याखाली मेंदू असेल तर विचार करा, असा हल्लाबोल ठाकरे यांनी केला होता.