मुंबई : बिग बॉसच्या घरात स्पर्धक असणाऱ्या जान कुमार सानूच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती. ‘मराठीची चीड येते’, या त्याच्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर टीका सुरू झाली होती. आता खुद्द जानच्या वडिलांनी म्हणजेच प्रसिद्ध गायक कुमार सानू यांनी समस्त महाराष्ट्रातील जनतेची जाहीर माफी मागितली आहे.
एका व्हिडीओद्वारे कुमार सानूने जानच्या कृत्याबद्दल सगळ्यांची माफी मागितली आहे. ‘गेल्या 40 वर्षात या ‘मुंबादेवी’च्या आशीर्वादाने मी इतका मोठा झालो. या भूमीने मला नाव आणि प्रसिद्धी दिली. अशा या मुंबई आणि महाराष्ट्राबद्दल अशी कुठलीच गोष्ट माझ्या मनातसुद्धा येणार नाही. मला भारतातील सगळ्या भाषांबद्दल प्रचंड आदर आहे. माझा मुलगा जान गेली 27 वर्ष माझ्यासोबत राहत नाही. त्याच्या आईने त्याला काय शिकवण दिली, कोणाशी कसे बोलावे हे शिकवले का?, या सगळ्या गोष्टींचा अंदाज मला नाही. परंतु, आता जानचा वडील या नात्याने मी सगळ्यांची माफी मागतो’, असे म्हणत त्यांनी सगळ्यांची माफी मागितली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* आई रिटा भट्टाचार्य यांनीही मागितली माफी
या प्रकरणावर जान कुमारची आई रीटा भट्टाचार्य यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “माझ्या मुलानं मराठी भाषेचा अपमान केला नाही. केवळ शोच्या टीआरपीसाठी हा मराठीचा मुद्दा उचलून धरला जातोय” असा दावा रीटा यांनी केला. त्या म्हणाल्या, “जानने मराठी भाषेबद्दल जे वाक्य उच्चारलं त्याचा अर्थ चुकीच्या पद्धतीने लावला जातोय. खरं तर जान मराठी भाषेवर नव्हे तर निक्की आणि राहुल यांच्यावर संतापला होता. तो कधीही मराठीचा अपमान करणार नाही. माझा जन्म महाराष्ट्रात झाला आहे. माझ्या पतीचं संपूर्ण करिअर महाराष्ट्रातच घडलं आहे. आम्ही आमच्या महाराष्ट्रीय मित्रमंडळींसोबत मराठीतच संभाषण करतो. मग माझ्या मुलाला मराठीचा राग का येईल? तरी देखील मी माझ्या मुलाच्या वतीने महाराष्ट्राच्या जनतेची हात जोडून माफी मागते.”
* जान सानूचीही माफी
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर जान कुमार सानूला योग्य ती समझ दिली होती. त्यानंतर बुधवारच्या भागात जान सानूने याबाबत चॅनलवर येऊन जाहीर माफी मागितली.