औरंगाबाद : सध्या झटपट लोन देण्यासाठी अनेक ॲप्स प्ले स्टोअरवर उपलब्ध आहेत. सोशल मीडियावर देखील आपण अशा अनेक जाहिराती पाहिल्या असतील. मात्र हे असले कर्ज घेणं म्हणजे आयुष्याशी खेळ ठरू शकतो. फक्त प्ले स्टोअरवरील अॅप्सवरुन फक्त आधार कार्डवर लोन देणाऱ्यांपासून सावधान राहाणं गरजेचं आहे. वाचा विस्तृतपणे औरंगाबादमधील घटनेविषयी.
हे कर्ज तुमची समाजात अतोनात बदनामी करणारे ठरेल. या ॲप्स चालकांच्या जीवघेण्या वसूली विरोधात औरंगाबाद येथील काही तरुण पोलिसात गेले आहेत. प्ले स्टोअर उपलब्ध असणारे अॅप आपल्याला पाच ते आठ हजारापर्यंत कर्ज देते. फक्त आधारकार्डवर लोन, फक्त पॅन कार्डवर लोन, विना गॅरंटर लोन मिळत असल्याने औरंगाबादेतील अनेक तरुणांनी अशाप्रकारचं कर्ज घेतलं. पाच हजार रुपयांचं कर्ज घेतलं तर प्रोसेसिंग फीस आणि इतर चार्ज लावत या कंपन्या आपल्याला केवळ अडीच हजार रुपये हातात देतात. मात्र परतफेड करतेवेळी आपल्याला पाच हजार रुपयेच द्यावे लागतात. ते ही सात दिवसात द्यावे लागतात.
* पाच हजाराकरिता शिवीगाळ, धमकीचे फोन
औरंगाबादेतील निशांत देशपांडे आणि संदीप कुळकर्णी या दोन तरूणांनी प्ले स्टोरवरून अॅप डाऊनलोड केले. या ॲपवरून प्रत्येकी 5 हजाराचे कर्ज घेतले. 10 दिवसांच्या अवधीत त्यांना ते फेडणं शक्य झालं नाही. वसूलीसाठी ससेमीरा सुरु झाला, धमकीचे फोन, शिवीगाळ देखील केली जाऊ लागली. अगदी सकाळी 6 वाजेपासून या ॲप्स चालवणाऱ्यांचा त्रास सुरु झाला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* वसूलीची ही नवी पद्धत
विशेष म्हणजे हे अॅप मोबाईलमध्ये घेतांना या अॅप्सकडून तुमची सगळी कॉन्टॅक्ट लिस्टही चोरली आहे. त्यामुळं तुम्ही कॉल घेतला नाही तर तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये प्रत्येकाला तुम्ही फ्रॉड असल्याचा मॅसेज जातोय. फक्त मॅसेजेच नाही तर तुमच्या फोटोवर तुम्ही फ्रॉड असल्याचं सांगत ग्राफिक्स तयार करतात आणि तेही तुमच्या सगळ्या कॉन्टॅक्ट्सना पाठवले जाते. वसूलीची ही नवी पद्धत चक्रावून टाकणारी आणि तितकीच धोकादायक सुद्धा आहे. पाच हजारांच्या वसूलीसाठी थेट हमरीतुमरीची भाषा केली जात आहे, शिवीगाळ आणि धमकी देखील दिली जात आहे.
वसुलीसाठी फोन करणार्या व्यक्तीला आपण महिलांशी बोलतोय का पुरुषांशी याचा देखील भान राहत नाही. औरंगाबाद येथे दिपाली मुंडे यांना तर चक्क शिविगाळ केल्याचा त्यांचा आरोप आहे. हे ॲप्स डाऊनलोड करताना आपल्याकडून कॉन्टॅक्ट आणि मेसेंजरची परवानगी घेतात. त्यामुळे आपले कॉन्टॅक्ट या कंपन्यांकडे असतात. आपल्या मोबाईल मधील नातेवाईकांचे कॉन्टॅक्ट घेऊन त्यांना देखील आपण गॅरेंटर असल्याचं सांगत त्यांनाही त्रास दिला जातो.
* पोलिसांकडे धाव, ॲपवर बंधन नाहीत
त्रासलेले युवक पोलिसांकडे याबाबत या सगळ्या युवकांनी एकत्र येत पोलिसांकडेही धाव घेतली. पोलिसांनी ऐकून घेत चाचपणी सुरु केली आहे. मात्र असे अनेक अॅप ज्यातून अशा पद्धतीची लूट सुरु आहे, हे गंभीर आहे. थोड्या पैशांसाठी तरूणाई या जाळ्यात अडकत चालली आहे. दुर्दैवानं या कर्ज देणाऱ्या या अॅपवर कुठलेही बंधन दिसत नाहीत. लोन घेतलं की जीवाचा त्रास अटळं असा हा प्रकार सुरू आहे. त्यामुळं पोलिसांनी सुद्धा अशा अॅपवर कारवाई करण्याची गरज आहे तर तरूणांनी सुद्धा झटपट कर्जाच्या मोहापासून दूर राहण्याची गरज आहे