नवी दिल्ली : इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (आयपीपीबी) आणि टपाल विभाग (डीओपी) यांनी मिळून त्यांचे डिजिटल पेमेंट अॅप ‘डाकपे’ सुरू केले. हे ॲप सुरू करीत मंत्रालयाने म्हटले आहे की, देशाच्या कानाकोपऱ्यात डिजिटल व्यवहारांसाठी हे ॲप सुरू करण्यात आले आहे.
डाकपे इंडिया टपाल नेटवर्क व आयपीपीबी डिजिटल फायनान्शियल व असिस्टेड बँकिंग सर्व्हिसेस यासारख्या वैशिष्ट्यांसह पोस्टल नेटवर्कद्वारे ऑफर करते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
या अॅपच्या लाँचिंगवेळी मंत्री रविशंकर प्रसाद यांनी इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्या प्रयत्नांचे कौतुक केले. ते म्हणाले की, कोरोना साथीच्या संकटाच्या काळातसुद्धा घरात लोकांना AePS आर्थिक सेवा देऊन त्यांनी बँकिंग प्रणालीपासून बरेच दूर असलेल्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम केले आहे. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेचे एमडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जय वेंकटरामु म्हणाले की, ‘डाकपे ही एक महत्त्वपूर्ण कामगिरी आहे. आमचे उद्दीष्ट हे – प्रत्येक ग्राहक महत्वाचे आहे, प्रत्येक व्यवहार महत्त्वपूर्ण आहे आणि प्रत्येक ठेव मौल्यवान आहे.
* निवृत्तीवेतनाधारकांसाठी डीएलसी सेवा
यापूर्वी आयपीपीबीने पेन्शनधारकांसाठी डीएलसी सेवा सुरू केली. ज्याद्वारे पेन्शनधारकांना घरून डिजिटल लाइफ सर्टिफिकेट सादर करता येतील. यासाठी एक छोटी फी भरावी लागेल. टपाल नेटवर्कची 1.55 लाख कार्यालये आहेत, त्यापैकी 1.35 लाख ग्रामीण भागात आहेत. यात एकूण 30,000 कर्मचारी कार्यरत आहेत.
* या आहेत सुविधा
१. ‘डाकपे’च्या माध्यमातून ग्राहक डोमेस्टिक मनी ट्रान्सफर अर्थात डीएमटीद्वारे पैसे पाठवू शकतात. याशिवाय तुम्ही क्यूआर कोड स्कॅन करून पैसेही पाठवू शकता. व्हर्च्युअल डेबिट कार्ड आणि यूपीआयच्या माध्यमातून कोणत्याही सेवा किंवा मर्चंटला पैसे पाठवू शकता.
२. बायोमेट्रिकद्वारे कॅशलेस इकोसिस्टम तयार करण्यात अॅप मदत करेल. याद्वारे, कोणत्याही बँकेच्या ग्राहकांना परस्पर व्यवहार करण्यायोग्य बँकिंग सेवा मिळतील. युटिलिटी बिल देखील तुम्ही भरु शकता.
३. याद्वारे बँकिंग सेवा आणि टपाल उत्पादनांचा ऑनलाईन लाभ घेता येईल. या माध्यमातून ग्राहक टपाल आर्थिक सेवा घर बसल्या घेऊ शकता.