मुंबई : मेट्रो कारशेडचे काम तत्काळ थांबवण्याचा निर्णय हायकोर्टाने दिल्यानंतर राज्य सरकार आणि विरोधी पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचे सत्र रंगल्याचं पाहायला मिळतंय. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे यांनी माफी मागावी आणि आदित्य ठाकरे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे.
कांजूरमार्ग मेट्रो कारशेडचे काम तत्काळ थांबवण्याचे निर्देश एमएमआरडीएला देण्यात आले आहेत. उच्च न्यायालयाच्या वतीनं हे निर्देश जारी करण्यात आले आहेत. हायकोर्टानं दिलेल्या निर्देशानंतर राज्य सरकारला मोठा धक्का बसला आहे. अशातच ठाकरे सरकारने माफी मागावी आणि आदित्य ठाकरेंनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपच्या वतीनं केली जात आहे.
भाजप नेते किरीट सोमय्या बोलताना म्हणाले की, “ठाकरे सरकारला मेट्रो कारशेडची अनधिकृत ऑर्डर मागे घ्यावी लागली. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेची माफी मागितली पाहिजे आणि पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे.”
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
“कारशेडच्या जागेच्या वादामुळे मेट्रो प्रकल्प रखडणार आहे. त्यासाठी 5 हजार कोटींचा अधिक खर्च आणि पाच वर्षांचा अधिक काळा लागणार आहे. त्यासाठी जबाबदार कोण असणार?”, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
* तत्काळ थांबवा; हायकोर्टाचे निर्देश
कांजूरमार्ग मेट्रो कारशेडचं काम तत्काळ थांबवण्याचे निर्देश एमएमआरडीएला देण्यात आले आहेत. उच्च न्यायालयाच्या वतीनं हे निर्देश जारी करण्यात आले आहेत. त्यामुळे मेट्रो कारशेडचा प्रकल्प बारगळणार आहे. तसेच तूर्तास भूखंडाची स्थिती ‘जैसे थे’ ठेवण्याचे निर्देशही हायकोर्टाकडून देण्यात आले आहेत. फेब्रुवारी महिन्यात यावर अंतिम सुनावणी घेण्याचं निश्चित करण्यात आलं आहे.
कांजूरमार्ग मेट्रो कारशेड प्रकरण हायकोर्टात गेल्यानंतर राज्य सरकार आपली बाजू मांडणार आहे. कांजूरमार्गच्या जागेवर राज्य सरकार आणि केंद्र सरकारनंही दावा ठोकला आहे. हाच वाद आता हायकोर्टात गेला आहे. आज या प्रकरणी उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. त्यानंतर कांजूरमार्ग मेट्रो कारशेडचं काम तत्काळ थांबवण्याचे निर्देश हायकोर्टाच्या वतीने एमएमआरडीएला देण्यात आले आहेत.
“कोर्टाच्या निर्णयाची बातमी ऐकली. त्यांना जे करायचं ते त्यांनी केलं. कायद्याच्या माध्यमातून सकारात्मक भूमिका घेता येईल याबाबत सरकार भूमिका घेईल. याबाबत सर्व अधिकारी तसेच संबंधितांशी चर्चा करुन पुढील भूमिका ठरवली जाईल. काम सुरु करण्यासाठी सर्व प्रकारे प्रयत्न केले जातील. कामं सुरु करण्यासाठी कुणी आडकाठी करु नये. विकासकामात आम्ही कधीच राजकारण करत नाहीत. आम्ही घेतलेला निर्णय केंद्र सरकारच्या फारच जिव्हारी लागलाय”
अजित पवार – उपमुख्यमंत्री