नवी दिल्ली : कांदा निर्यातीवरील बंदी केंद्र सरकारने हटवण्याचा निर्णय घेतला आहे. मोदी सरकारने काल सोमवारी एक आदेश जारी करत 1 जानेवारीपासून सर्व प्रकारच्या कांद्यांची निर्यात करण्यास परवानगी दिली आहे. तत्पूर्वी, सरकारने 14 सप्टेंबर 2020 रोजी कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली होती. यामुळे कांदा उत्पादक शेतक-यांमधून समाधान व्यक्त होत आहे.
सरकारचा हा निर्णय म्हणजे, कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. शेतकऱ्यांकडे सध्या किती कांदा उपलब्ध आहे हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही. केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातल्यानंतर शेतकरी संघटना आणि शेतकऱ्यांनी सरकारवर निशाणा साधला होता.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
अखेर आता केंद्राने हा निर्णय मागे घेतला आहे. ऑक्टोबर महिन्यात केंद्र सरकारने किरकोळ आणि ठोक व्यापाऱ्यांच्या कांदा साठवणुकीवर मर्यादा घातली होती. यात किरकोळ व्यापारी 2 टन, तर ठोक व्यापारी केवळ 25 टनांपर्यंतच कांदा साठवून ठेवू शकतात, अशी अटही घालण्यात आली होती.
याच बरोबर ‘बेंगलोर रोज’ आणि ‘कृष्णपुरम कांदा’ यांच्या निर्यातीवरील बंदीदेखील 1 जानेवारीपासून उठणार आहे. या कांद्यांवर सरकारने 9 ऑक्टोबर 2020 रोजी बंदी घातली होती. यापूर्वी सप्टेंबर 2019 मध्येही केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली होती. त्यावेळी मागणी आणि पुरवठा यांत मोठी दरी निर्माण झाल्याने कांद्याच्या किमती आकाशाला भिडल्या होत्या. त्यावेळी महाराष्ट्रासारख्या प्रमुख कांदा उत्पादक राज्यात पाऊस आणि पुरामुळे कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले होते.