अमरावती : अमरावती जिल्ह्यात कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. त्यातच आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत कौर राणा यांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. यात राणा दाम्पत्य बुलेटवर विनामास्क फिरताना दिसत आहेत. त्यामुळे यावर नागरिक संतप्त प्रतिक्रिया देत आहेत. कोरोना वाढतोय याचे गांभीर्य त्यांना दिसत नाही, असं लोक म्हणत आहेत. तसेच पोलीस राणा दाम्पत्यावर कारवाई करणार का, असा प्रश्न ते करत आहेत.
अमरावती जिल्ह्यात कोरोनाचे थैमान दिसून येत आहे. आमदार-खासदार विनामास्क सुसाट असल्याने जोरदार चर्चा सुरु झाली आहे. राणा दाम्पत्याची विनामास्क आणि विनाहेल्मेट बुलेटवारी चर्चाचा विषय झाली आहे. हा लोकप्रतिनिधींचा बेजबाबदारपणा आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहेत. आधीच कोरोनाचा धोका जिल्ह्यात असताना अशी बेफीर कशासाठी, अशाने कोरोना वाढला तर जबाबदार कोण, असे सवाल उपस्थित करण्यात येत आहेत.
एकीकडे अमरावती जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने प्रत्येकाला मास्क वापरणे गरजेचे आहे. तसेच आता पोलिसांनी प्रत्येक दुचाकीस्वारांना मास्क घालणे बंधनकारक केले आहे. पण अमरावतीच्या खासदार नवनीत कौर-राणा आणि आमदार रवी राणा यांना मात्र कोरोना वाढतोय याचे गांभीर्य दिसत नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
लोकप्रतिनिधी असणाऱ्या राणा दांपत्याने कोरोनाचे नियम पायदळी तुडवत विना मास्क आणि विना हेल्मेट अमरावती शहरात बुलेट वारी केली. आता पोलीस राणा दाम्पत्यावर कारवाई करणार का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
* आधी कोरोना होऊनही बेफिक्री
अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना याआधी कोरोना झाला होता. नवनीत कौर राणा यांना दोन वेळा कोरोनाची बाधा झाली होती. त्यांना ऑगस्ट २०२० मध्ये तातडीने मुंबईत हलविण्यात आले होते. त्यांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर मुंबई महापालिकेकडून त्यांची पुन्हा चाचणी करण्यात आली. या चाचणीचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे पालिकेकडून त्यांना पुढील 15 दिवस क्वारंटाईन राहण्याचा सल्ला दिला होता. असे असताना त्यांच्याकडून कोविड-19 च्या नियमांची पायमल्ली कशासाठी, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.