मुंबई : गोरबंजारा समाजातील मुलगी पूजा चव्हाण हीचा पुणे शहरातील वानवाडी परिसरात मृत्यू झाला. तिच्या मृत्यूचे दुःख मला, माझ्या कुटुंबीयांना आणि संपूर्ण बंजारा समाजाला आहे. पण या घटनेनंतर माझ्यावर विरोधकांकडून बिनबुडाचे आरोप करण्यात आले. अतिशय घाणेरडं राजकारण केले जात आहे. ते अतिशय चुकीचं आणि निराधार आहे. माझ्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप खोटे आहेत. या एका घटनेमुळे मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करू नका, असे राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी आज पोहरादेवी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.
संशयाच्या भोवऱ्यात अडकलेले राज्याचे वनमंत्री संजय राठोड आज अखेर समोर आले. पोहरादेवी येथे ते कुटूंबासह दाखल झाले. याठिकाणी राठोड यांनी कुटूंबासह जगदंबा मातेचे दर्शन घेतले. यावेळी संजय राठोड यांच्या समर्थकांनी प्रचंड गर्दी केली होती. त्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेत, संबंधितांवर जिल्हा व पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी, असे आदेश दिले आहेत.
बिड जिल्ह्याच्या परळी येथील टिकटॉक स्टार पूजा चव्हाण हीचा पुणे येथे वानवाडी परिसरात ८ फेब्रुवारीला मृत्यू झाला. त्यानंतर राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांच्यावर विरोधकांकडून विविध आरोप करण्यात आले. आज १५ दिवसांनंतर ते वाशीम जिल्ह्याच्या मानोरा तालुक्यातील बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहरादेवी येथे पत्नी आणि साळा सचिन नाईक यांच्यासह दर्शनासाठी गेले. तेथे त्यांनी संत सेवालाल महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. महंत सुनील महाराज यांनी त्यांच्यासाठी तेथे हवन केला. तेथे मंत्री राठोड माध्यमांशी बोलणार की नाही, याबद्दलही साशंकता होती. पण ते माध्यमांसमोर आले आणि एका घटनेमुळे मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करू नका, असे माध्यमांना सांगितले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* परिवाराची, समाजाची बदनामी
राठोड म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. चौकशीनंतर प्रकरणातील सत्य काय ते समोर येणारच आहे. विविध माध्यमांतून माझी, माझ्या परिवाराची आणि समाजाजी बदनामी केली जात आहे. राज्यात त्याबद्दल घाणेरडं राजकारण केलं जात आहे, हे दुर्देवी आहे. मी भटक्या जमातीतील व्यक्ती समाजकारणातून राजकारणात आलो. गेले ३० वर्ष मी समाजासाठी जनतेसाठी काम करतो आहे. ओबीसी समाजाचं नेतृत्व करत आहो. पण या एका घटनेवरून विविध आरोप करून मला राजकीय आयुष्यातून उद्धवस्त करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
गेल्या १५ दिवसांपासून मी गायब आहे, असे विविध माध्यमांतून सांगितले जात आहे. मी १५ दिवस नव्हे, तर १० दिवस लोकांसमोर आलो नाही. कारण मिडीयावर लोकांचे माझ्यावर असलेले प्रेम मी पाहत होतो. इतके घाणेरडे आरोप माझ्यावर झाल्यानंतर माझे वडिल, पत्नी आणि मुलांना सांभाळण्याची मोठी जबाबदारी माझ्यावर होती. त्यांना सांभाळणं मला खुप अवघड गेले. त्यामुळे त्यांना सांभाळण्यात माझा जास्त वेळ गेला. या घटनेतून सावरल्यानंतर मी आज समोर आलो असल्याचेही मंत्री राठोड म्हणाले.
* जमावावर लाठीचार्ज
पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी गंभीर आरोप झालेले राज्याचे वनमंत्री संजय राठोड अखेर पोहरादेवीत पोहोचले. यावेळी त्यांनी सपत्नीक पोहरादेवीचे दर्शन घेतले. राठोड यांचे अनेक समर्थक या ठिकाणी जमले आहेत. यावेळी थोडे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. जमावबंदीचा आदेश या ठिकाणी लागू आहे. मात्र मोठ्या प्रमाणात लोक जमल्याने पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.