मुंबई : बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ म्हणून सुपरस्टार आमिर खानला ओळखले जाते. आमिर खान जेव्हा कोणत्याही चित्रपटाच्या प्रोजेक्टशी जोडला जातो, तेव्हा चाहत्यांच्या मनात त्या चित्रपटाच्या यशाबद्दल विश्वास आपसुकच निर्माण होतो. याचमुळे तो जेव्हा ‘महाभारत’ सारख्या मोठ्या प्रोजेक्टशी जोडला गेला, तेव्हा या प्रोजेक्टबाबतच्या चर्चांनी चांगलाच जोर धरला.
यानंतर असे वृत्त आले होते की, हा चित्रपट चित्रपटगृहात नाही, तर ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. परंतु आता हाती आलेल्या वृत्तानुसार, आमिर खानने या प्रोजेक्टवर काम करण्यास नकार दिला आहे. यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे या प्रोजेक्टचे वेळापत्रक होय.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
माध्यमांतील एका वृत्तानुसार, आमिर खानने खूप विचार करून हा चित्रपट न करण्याचा निर्णय घेतला आहे. कारण चित्रपट तयार होण्यास तब्बल ५ वर्षांचा कालावधी लागणार होता. म्हणजेच आमिर खानने आपल्या ३ चित्रपटांचे नुकसान करवून घेतले असते. यासोबतच हा चित्रपट ज्या लेव्हलवर बनवला जाणार होता, ते कोणत्याही प्रकारे व्यावहारिक नव्हता.
एका वृत्तानुसार, या प्रोजेक्टसोबत अनेक वाद होते. कट्टरपंथी संघटनांनी महाकाव्यावर चित्रपट बनवण्यासाठी आमिर खानवर प्रश्न उपस्थित केले. अशामध्ये त्याने विचार केला की, आता ही योग्य वेळ नाहीये. तरीही, आतापर्यंत याबाबत अधिकृत वक्तव्य करण्यात आलेले नाही. आमिर खान सध्या आपल्या ‘लाल सिंग चड्ढा’ या नवीन चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत करीना कपूर खानही झळकणार आहे. आमिर खानने आतापर्यंत अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. त्यामध्ये ‘३ इडियट्स’, ‘लगान’, ‘दंगल’ यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे.