नांदेड : ‘मला मणक्याचा त्रास आहे. त्यामुळे मी घोडा खरेदी करायचे ठरवले असून कार्यालयीन परिसरात बांधण्याची परवानगी द्यावी,’ अशी मागणी नांदेडचे सहायक लेखाधिकारी सतीश देशमुख यांनी रीतसर पत्र लिहून केली. हे पत्र व्हायरल झाले व याची राज्यभर चर्चा सुरु झाली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी समज दिल्यानंतर देशमुखांनी ही मागणी मागे घेत माफीनामा सादर केला आहे. मात्र, इंधन दरवाढीवरुन ही मागणी केल्याचे अनेकांना वाटले.
नांदेड जिल्हाधिकारी कार्यालतील एका अधिकाऱ्याने ही अशी विचित्र मागणी केली. त्यांनी ऑफिसला येण्यासाठी घोड्याची योजना आखली. त्यानुसार त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी परिसरात घोडा बांधण्याची परवानगी मागितली आहे. त्यामुळे या अधिकाऱ्याची चांगलीच चर्चा रंगली आहे.
नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात रोजगार हमी योजनेचे सहाय्यक लेखाधिकारी असलेल्या सतीश पंजाबराव देशमुख यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, मला पाठीच्या कण्याचा त्रास असल्याने दुचाकीवरुन येताना त्रास होत आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
यावर उपाय म्हणून मी घोडा खरेदी करण्याचे ठरवले आहे. जेणेकरुन मला वेळेत घोड्यावर येणं शक्य होईल. त्यामुळे घोडा बांधण्याची मला परवानगी मिळावी. देशमुख यांनी पाठवलेल्या पत्राला पोहोच देण्यात आली होती. त्यामुळे जिल्हाधिकारी काय निर्णय देतात याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. मात्र, ही मागणी आता मागे घेण्यात आली आहे.
सहाय्यक लेखाधिकारी असलेल्या सतीश पंजाबराव देशमुख यांच्या मागणीचा अर्ज सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे. दरम्यान, सहाय्यक लेखाधिकारी देशमुख यांनी आणखी एक अर्ज जिल्हाधिकाऱ्यांना लिहून ही मागणी मागे घेत असल्याचे सांगितले आहे. मात्र, त्यांनी असा अर्ज का केला? आणि तो नंतर मागे का घेतला? ही बाब मात्र गुलदस्त्यात राहिली आहे. पण, त्यांच्या एका अर्जामुळे सोशल मीडियावर मात्र चर्चांना उधाण आले आहे.