मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू आणि प्रसिध्द दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्यावर आयकर विभागाने कारवाई केली. यानंतर शिवसेनेच्या सामनातून मोदी सरकारवर हल्लाबोल करण्यात आला. ‘तापसी, अनुरागसारखी मोजकीच मंडळी शेतकऱ्यांच्या बाजूने उभी राहिली. त्याची किंमत त्यांना चुकवावी लागत आहे. शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे राहिल्याने तापसी-अनुरागवर कारवाई करण्यात आली आहे’, असे सामनात म्हटले आहे.
तापसी पन्नू, अनुराग कश्यपवरील कारवाईनंतर शिवसेनेने मोदी सरकारवर निशाना साधला. ‘हिंदी सिनेसृष्टीतले इतर सर्व व्यवहार, उलाढाली स्वच्छ पारदर्शक होत आहेत, अपवाद फक्त अनुराग आणि तापसीचा. कुठेतरी गडबड आहे. पण, तुमच्या त्या बॉलिवूडमध्ये जी कोटीच्या कोटी उड्डाणे रोज होतात, ते काय गंगाजलाच्या प्रवाहातून वर येतात? पण कुठेतरी पाणी मुरत असल्याने सरकारच्या तालावर नाचायचे हेच घडत आहे’, असेही सामनात म्हटले आहे.
चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि अभिनेत्री तापसी पन्नू यांची बुधवारी सकाळपासून इनकम टॅक्स विभागाकडून चौकशी सुरु आहे. या चौकशीदरम्यान या दोघांशी संबंधीत ऑफिसेस आणि मालमत्तांवर इनकम टॅक्स विभागाकडून छापे टाकण्यात आलेत. मुंबई, पुणे, हैदराबाद आणि दिल्ली या चार शहरांमधील एकूण 28 ठिकाणी हे धाडसत्र सुरु आहे. तापसी पन्नु आणि अनुराग कश्यप हे सिनेमाच्या शूटिंगसाठी पुण्यातील वेस्टीन हॉटेलमधे थांबलेले असताना तिथेच त्यांची चौकशी करण्यात येत आहे. या चौकशीमध्ये या दोघांशी संबंधीत मिडीया प्रोडक्शन कंपनीला सिनेमामुळे बॉक्स ऑफिसवर जितका फायदा झालाय त्यापैकी 300 कोटी रुपयांचा हिशेब देण्यात हे दोघे असमर्थ ठरल्याच इनकम टॅक्स विभागाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटंल आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सीबीडीटीने सांगितलं की, प्रोडक्शन हाऊसच्या शेअर्सच्या देवाण-घेवाणीत झालेल्या फेरफारी संबंधित काही पुरावे हाती लागले आहेत. 350 कोटी रुपयांच्या टॅक्समध्ये गडबड झाल्याची माहिती मिळाली आहे. अभिनेत्री तापसी पन्नूच्या नावावर 5 कोटी रुपयांची कॅश रिसिप्टही मिळाली आहे. याप्रकरणी तपास सुरु आहे.
यापूर्वी अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की, ही छापेमारी फँटम फिल्म्सच्या विरोधात कर चोरीचा तपासाचा एक हिस्सा आहे. त्यांनी सांगितलं की, ही छापेमारी 30 ठिकाणांवर करण्यात आली आहे. दरम्यान, फँटम फिल्म्स प्रोडक्शन हाऊस 2018 नंतर बंद करण्यात आलं होतं. यामध्ये याचे तत्कालीन प्रचारक अनुराग कश्यप , निर्देशक-निर्माता विक्रमादित्य मोटवाने, निर्माता विकास बहल आणि निर्माता-वितरक मधु मंटेना यांचा समावेश होता.
* अनुराग, तापसीवर कारवाई; 300 कोटींची अनियमितता उघड
बॉलीवूडमधील प्रसिद्ध दिग्ददर्शक अनुराग कश्यप, अभिनेत्री तापसी पन्नू यांच्या घरी आयकर विभागाने टाकलेल्या छाप्यात मोठी माहिती समोर आले आहे. या सेलिब्रिटींच्या आर्थिक व्यवहारात 300 कोटींवर अनियमितता आढळून आली. त्यांच्या घर व कार्यालयांवरील आयकर विभागाच्या छाप्याची कारवाई दुसऱ्या दिवशीही सुरु होती. अनुराग कश्यप व तापसीचे मोबाइल व लॅपटॉप जप्त करण्यात आले आहे.
* ‘भाजपने पोलिस, ईडी, सीबीआय, एनसीबीचा वापर केला’
बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि अभिनेत्री तापसी पन्नू यांच्याविरोधात आयकर विभागाने आज धाडसत्र सुरू केली. आयकर विभागाच्या पथकांनी अनुराग आणि तापसीच्या मुंबईतील मालमत्तेवर छापे टाकत झाडाझडती सुरू केली. यावरून अभिनेता कमाल रशीद खान म्हणजेच केआरके याने भाजपवर हल्लाबोल केला. ‘भाजपा सरकारने पोलिस, ईडी आयटी डिपार्टमेंट, सीबीआय आणि एनसीबी यांचा वापर केला आहे’ या आशयाचे ट्वीट केले आहे.
* बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये दहशतवादी भरले – कंगना
दरम्यान या कारवाईवर अभिनेत्री कंगना रणौत हिने प्रतिक्रिया देत या कलाकारांची तुलना दहशतवाद्यांशी केली. “मला पहिल्यापासूनच माहित होत ही मंडळी देशविरोधी कृत्य करत आहेत” असा टोला तिनं लगावला. ही मंडळी जेव्हा राष्ट्रविरोधी जाहिराती करुन मजुरांना भडकवण्याचा प्रयत्न करत होती तेव्हाच कळलं होतं काही तरी गडबड आहे. माहिती परत घेतली जाऊ शकते परंतु हे लहान मासे आहेत. बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये दहशतवादी भरले आहेत. ही मंडळी आपल्या पैशांचा वापर करुन भारताचे तुकडे करण्याचा प्रयत्न करत आहेत. सरकारनं अशा लोकांना चांगलाच धडा शिकवायला हवा.” अशा आशयाची दोन ट्विट्स करुन कंगनानं अनुराग आणि तापसीवर जोरदार टीका केली.