नवी दिल्ली : भारतात कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू आहे. पण अजूनही लोकांच्या मनात संभ्रम आहे. त्यातील महत्त्वाचा प्रश्न, कोरोना लस घेतल्यानंतर दारू पिणे योग्य आहे का? यावर आरोग्य मंत्रालय म्हणाले, की ‘कोरोना लस घेतल्यानंतर दारू पिल्यास रूग्णाला त्रास झाल्याचा कुठलाही पुरावा उपलब्ध नाही. लस घेतल्यानंतर महिलांच्या प्रजनन क्षमतेवर वाईट परिणाम होतो ही अफवा आहे. लसीचे दुष्परिणाम दिसले असते तर मान्यताच दिली नसती’.
भारतात कोरोना लसीकरणाची सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशातील पहिल्या टप्प्यातील कोरोना लसीकरण अभियानाला सुरुवात केली. भारतात लस घेतल्यानंतर अधिकृतपणे, मद्यपानासंबंधी कोणताही इशारा देण्यात आलेला नाही. परंतु जगभरातील जाणकारांनी वॅक्सिनेशनच्या आधी आणि वॅक्सिनेशनच्या नंतर मद्यपान केल्यामुळे अनेक प्रकारच्या समस्या येऊ शकतात, असं म्हटलं आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरु झाला आहे. पहिल्या टप्प्यात प्राधान्याने आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन कर्मचारी आदींना लस देण्यात आली. आता दुसऱ्या टप्प्यात 60 वर्षांवरील व्यक्ती तसेच अन्य आजार असलेल्या 45 वर्षांवरील व्यक्तींचे लसीकरण करण्यात येत आहे. आतापर्यंत सुमारे दीड कोटी नागरिकांचे लसीकरण झाले आहे. देशभरातील काही नागरिकांना सुरुवातीच्या टप्प्यात कोरोना लसीचे दोन डोस दिले जाणार आहेत.
जगभरातील एक्सपर्ट्सचं असं म्हणणं आहे की, कोरोना लस घेण्याआधी आणि नंतर सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे. याच सावधगिरी बाळगण्यामध्ये एक मद्यपान आहे. मद्यपानाचा रोगप्रतिकारशक्ती अर्थात इम्यूनिटीवर वाईट परिणाम होतो. यामुळे रोगाशी लढण्याची क्षमता कमजोर होते. कोरोना लस इम्यूनिटीवरच काम करते. त्यामुळे लस घेण्याआधी आणि लस घेतल्याच्या काही दिवसांनंतरही मद्यपान न करण्याचं जाणकारांनी सांगितलं आहे.
लसीकरणाच्या किती वेळ आधी आणि किती वेळ नंतर मद्यपान करू नये, याबाबत अनेक एक्सपर्ट्सचं वेगवेगळं मत आहे. रशियाच्या हेल्थ एक्सपर्ट्सचं असं म्हणणं आहे की, स्पुतनिकची लस घेण्याआधी दोन आठवडे आणि लस घेतल्यानंतर सहा आठवड्यांपर्यंत मद्यपान करू नये. तर, हे वॅक्सिन बनवणारे डॉक्टर अलेक्जेंडर गिन्टबर्ग यांनी, लस घेण्याआधी आणि नंतर तीन दिवसांपर्यंत मद्यपान न करण्याचं सांगितलं आहे.
ब्रिटनच्या हेल्थ एक्सपर्ट्सनी, लस घेण्याच्या एक दिवस आधी आणि लस घेतल्यानंतर एक दिवसापर्यंत मद्यपान करू नये असं सांगितलं आहे. दरम्यान, पहिल्या लशीनंतर मास्क न घालण्याची चूक करू नका. कारण दुसऱ्या लशीनंतर इम्युनिटी विकसित होत असल्याचं मोदी म्हणाले. त्यामुळे मास्क घालून, सोशल डिस्टंन्सिंग पाळण्याचं आवाहन मोदींनी देशवासियांना केलं आहे.