कोलकाता : अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी बोलताना ‘मी कोब्रा आहे. कुणी जर हक्क हिसकावून घेत असेल, तर मी उभा राहिल. माझा एक दंश पुरेसा आहे’, असं म्हणाले. तसेच ‘मी बंगाली आहे आणि जो कुणी इथे वाढला आहे, त्याचा भूमीवर अधिकार आहे. मी ग्वाही देतो की, पश्चिम बंगालमध्ये राहणाऱ्या प्रत्येक माणसाच्या हक्कासाठी मी लढेल’, असंही ते म्हणाले.
अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांनी आज रविवारी कोलकात्यात भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत मिथुन यांचा पक्ष प्रवेश करवण्यात आला. यावेळी मिथुन चक्रवर्ती म्हणाले की, ‘आम्हाला गरीबांसाठी काही करायचे आहे. आम्ही बंगाल मध्ये राहणाऱ्या सर्वांना बंगाली मानतो’.
पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी भाजप प्रवेश केला आहे. कोलकत्ता येथील ब्रिगेड परेड ग्राऊंडवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
आज दिनांक ७ मार्च रोजी मिथुन चक्रवर्ती यांनी भाजप नेते कैलास विजयवर्गीय यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर मिथुन चक्रवर्ती हे भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवण्यात येवू लागली तोच अनपेक्षितरित्या आजच्याच दिवशी भाजप प्रवेश केला. त्यांनी कोलकाताच्या ब्रिगेड मैदानामध्ये पंतप्रधान मोदींच्या रॅलीमध्ये मंचावर भाजपचा झेंडा फडकावत पक्षप्रवेश केला. या दरम्यान बंगालचे भाजप अध्यक्ष दिलीप घोष आणि कैलास विजयवर्गीय मंचावर उपस्थित होते.
यापूर्वी मिथुन चक्रवर्ती ममता बॅनर्जी यांच्या तृणमुल काँग्रेसच्या पाठींब्यावर राज्यसभेचे खासदार राहिले आहेत. सोबतच राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीदरम्यान ममतांचा पाठींबा मिळवून प्रणब मुखर्जी यांना राष्ट्रपती करण्यात त्यांची महत्वाची भूमिका असल्याचं सांगण्यात येत. 2016 च्या निवडणूकीमध्ये भाजपला फक्त ३ जागांवर समाधान मानावे लागले होते. २०२१ च्या संभाव्य निवडणूकीत मिथून भाजपसाठी स्टार प्रचारक ठरतील अशी चिन्हे आहेत.
* चिटफंड घोटाळ्यामुळे खासदारकीचा राजीनामा
मिथून यांच्या राजकीय जीवनाबद्दल बोलायचे तर त्यांनी या आधी तृणमूल काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. तृणमूल काँग्रेस पक्षाकडून ते राज्यसभेवर सदस्य म्हणूनही गेले होते. मात्र, चिटफंड घोटाळ्यात नाव आल्यानंतर त्यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला होता. आता त्यांनी थेट भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. वयाच्या सत्तरीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. ही राजकीय इनिंग त्यांना कशी लाभते याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे.