नवी दिल्ली : भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूने एकेरी स्विस बॅडमिंटन ओपन स्पर्धेत फायनलमध्ये प्रवेश केला आहे. सिंधूने डेन्मार्कची मिया ब्लिचफेल्ट हिला सलग २ फेऱ्यात हरवले. यावेळी सिंधूने २२-२० आणि २१-१० अशी खेळी केली. यानंतर ती फायनलमध्ये पोहोचली. महिलांच्या एकेरी बॅडमिंटन स्पर्धेत सिंधूने ४३ मिनिटे खेळी केली. आता फायनलमध्ये ती काय धमाल करतेय? याकडे लक्ष लागले आहे.
भारतीय बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूने स्विस ओपन बॅडमिंटन स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. पुरुष ऐकेरीत भारताचा किदाम्बी श्रीकांत हा देखील उपांत्य फेरीत दाखल झाला आहे.
ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या पी. व्ही. सिंधू हिने अप्रतिम कामगिरीचे प्रदर्शन करत स्विस खुल्या सुपर ३०० बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. मात्र गतविजेत्या किदम्बी श्रीकांतला उपांत्य फेरीत पराभवाचा धक्का सहन करावा लागला. तसेच दुसऱ्या मानांकित सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांचे पुरुष दुहेरीतील आव्हानही उपांत्य फेरीत संपुष्टात आले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
जगज्जेत्या सिंधूने चौथ्या मानांकित ब्लिचफेल्ड हिला अवघ्या ४३ मिनिटांत २२-२०, २१-१० असे सहज पराभूत केले. यासह सिंधूने योनेक्स थायलंड खुल्या स्पर्धेतील सलामीच्या सामन्यातील पराभवाचा वचपा काढला. आता सिंधूला जेतेपदासाठी स्पेनची अग्रमानांकित कॅरोलिन मरिन हिच्याशी लढत द्यावी लागेल. सिंधूने २०१९ सालच्या जगज्जेतेपदाच्या लढतीनंतर प्रथमच अंतिम फेरी गाठली आहे.
पहिल्या गेममध्ये ब्लिचफेल्ड हिने सिंधूला कडवी लढत दिली. पण सिंधूने आक्रमक खेळ करत पहिला गेम २२-२० अशा फरकाने आपल्या नावावर केला. पहिला गेम जिंकल्यानंतर आत्मविश्वास उंचावलेल्या सिंधूने प्रतिस्पर्धीला डोके वर काढण्याची कोणतीही संधी दिली नाही. दुसरा गेम २१-१० असा आरामात जिंकत तिने अंतिम फेरीतील स्थान निश्चित केले.