मुंबई : मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी पोलिस अधिकारी सचिन वाझे यांना अटक करा, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ आढळली होती. या गाडीचे मालक मनसुख हे होते. त्यांचा मृतदेह गेल्या आठवड्यात आढळून आला होता. त्यांनी आत्महत्या केली असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थाही चौकशी करत आहे.
मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणावरुन विधानसभा विरोधी पक्षतेने देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा एन्काऊंटर स्पेशलिस्ट सचिन वझे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
मनसुख हिरेन यांची हत्या करून त्यांचा मृतदेह खाडीत फेकण्यात आल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत करत पोलीस अधिकारी सचिन वझे यांच्यावर गुन्हा नोंदविण्याची मागणी केली आहे.
मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी आज माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा खून झाल्याचा आरोप केला आहे. विधानसभेत बोलतांना फडणवीस म्हणाले की, सदरचा खून सचिन वझे यांनी केला असावा असा माझा संशय आहे, त्यामुळे सखोल चौकशी करुन कायदेशीर कारवाई करण्याची मागणी मनसुख हिरेन यांच्या पत्नीने केली. देवेंद्र फडणवीस यांनी मनसुख हिरेन यांच्या पत्नीने दिलेली तक्रार वाचून दाखवली.
* तिन्ही दिवस मनसुख हिरेन सचिन वझेंसोबतच
“२६ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी माझे पती चौकशीसाठी सचिन वझे यांच्यासोबत गुन्हे शाखेत गेले. त्यानंतर १०.३० वाजता आले. दिवसभर सचिन वझेंसोबत होतो असं मला त्यांनी सांगितलं. २७ फेब्रुवारीला सकाळी माझे पती पुन्हा मुंबई गुन्हे शाखेत गेले आणि रात्री १०.३० वाजता आले. त्यानंतर २८ फेब्रुवारीला पुन्हा एकदा सचिन वझेंसोबत गेले आणि जबाब नोंदवला. जबाबाची प्रत घऱी आणून ठेवण्यात आली. त्यावर सचिन वझे यांची स्वाक्षरीदेखील आहे,” असं तक्रारीत नमूद असल्याची माहिती फडणवीसांनी दिली. पुढे ते म्हणाले की, “याचाच अर्थ दुसऱ्या कोणीही त्यांची चौकशी केलेली नाही. तिन्ही दिवस ते सचिन वझेंसोबत होते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* मनसुख हिरेनच्या पत्नीचे गंभीर आरोप
तक्रारीत मनसुख हिरेन यांच्या पत्नीने दिलेल्या माहितीनुसार, २ मार्च रोजी माझे पती घरी आल्यानंतर ते सचिन वझे यांच्यासोबत मुंबई येथे गेले होते आणि त्यांच्या सांगण्यावरुन वकील गिरी यांच्याकडून पोलीस आणि मीडियामधून फोन येत असल्याची तक्रार करण्यास सांगितलं. माझ्या पतीकडे पोलिसांनी काही मारहाण केली का? काही त्रास दिला का? याबाबत विचारणा केली होती. यावर त्यांनी कोणीही मारहाण केली नाही किंवा त्रास दिला नाही असं सांगितलं. पण चौकशी झाल्यानंतरही पोलीस वारंवार फोन करत असल्याने तक्रार दिल्याचं सांगितलं अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
* अद्याप अटक का नाही ? – फडणवीस
संपूर्ण परिस्थिती पाहता माझ्या पतीचा खून झाला असावा अशी खात्री आहे. सदरचा खून सचिन वझे यांनी केला असावा असा माझा संशय आहे, त्यामुळे सखोल चौकशी करुन कायदेशीर कारवाई करण्याची मागणी मनसुख हिरेन यांच्या पत्नीने केली असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली. सचिन वझे यांना अद्यापपर्यंत अटक का करण्यात आलेली नाही? अशी विचारणा करताना कोण पाठराखण करत आहे? असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला.