सोलापूर : सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले आहे. यामुळे सोलापुरातील सहकार क्षेत्रात खळबळ माजली आहे. या दूध संघावर आता प्रशासक मंडळाची नियुक्ती करण्यात आली आहे. दूध संघामध्ये झालेली अनियमितता, घटलेले दूध संकलन, बिघडलेली आर्थिक शिस्त या कारणास्तव प्रशासक मंडळ नियुक्त करण्यात आल्याची माहिती पुणे विभागाचे दुग्ध उपनिबंधक सुनील शिरापूरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
संघाच्या संचालक मंडळाच्या कार्यकाळात दूध संस्थांची बिले अडविणे, कर्मचार्यांचे वेतन थांबविणे, संघाच्या मालकीच्या मालमत्तांची विक्री केल्याचे आरोप झाले होते. त्यासंदर्भात काही दिवसांपूर्वी दूध संघाला संचालक मंडळ बरखास्तीबाबत विभागीय उपनिबंधकांनी नोटीसही दिली होती.
यावर तीन ते चार वेळा सुनावणी झाली. मात्र मध्यंतरीच्या काळात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे दूध संघाने म्हणणे सादर केले नव्हते. नोव्हेंबर व डिसेंबर 2020 मध्ये पुन्हा नोटीस बजावून सुनावणी घेण्यात आली होती. त्यानंतर 7 जानेवारी 2021 रोजी अंतिम सुनावणी झाली होती. दूध संघावर अशी कारवाई करण्यापूर्वी राज्याच्या फेडरल संघाचा अभिप्राय घेणे बंधनकारक होते. त्याबाबत महानंदाकडे अभिप्राय मागितला होता. मात्र त्याकडे महानंदाकडूनही दुर्लक्ष झाले. त्यामुळे महानंदाला याबाबत काहीच म्हणायचे नाही असे समजून शिरापूरकर यांनी 25 फेब्रुवारी 2021 रोजी संघाचे संचालक मंडळ बरखास्त करण्याचा निर्णय घेतला.
सोलापूर जिल्हा सहकारी दुध उत्पादक व प्रक्रिया संघाच्या संचालक मंडळाने कारभारात अक्षम्य दुर्लक्ष केल्याचा ठपका विभागीय दुग्ध उपनिबंधक सुनील शिरापूरकर यांनी ठेवला आहे. दहा मुद्द्यावरून दूध संघाच्या संचालक मंडळाला बजावलेल्या नोटीसला संचालक मंडळ समाधानकारक उत्तर देऊ न शकल्याने दूध संघाचे संचालक मंडळ बरखास्त करुन संघावर प्रशासक मंडळ नियुक्त करण्यात आले आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 च्या कलम 78 (अ) अन्वये ही कारवाई झाली आहे दूध संघाच्या प्रशासक मंडळ अध्यक्षपदी विभागीय दुग्ध उपनिबंधक सुनील शिरापूरकर यांची नियुक्ती झाली असून सदस्यपदी सहाय्यक निबंधक आबासाहेब गावडे व सहकार अधिकारी सुनील शिंदे यांची सदस्य म्हणून नियुक्ती झाली आहे.
25 फेब्रुवारीला घेतलेल्या या आदेशाची सोमवार (ता. 8 मार्च) पासून अंमलबजावणी झाली. प्रशासक मंडळाने जिल्हा दूध संघाचा पदभार स्वीकारला आहे. संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी पात्र ठरलेल्या जिल्हा दूध संघाचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक मंडळ नियुक्त झाल्याने पुढील किमान एक वर्ष तरी दूध संघाची निवडणूक आता अशक्य मानली जात आहे.
आज अपात्र झालेल्या संचालक मंडळातील सदस्यांना दूध संघाच्या संचालक मंडळाची निवडणूक लढता येणार आहे. आज झालेल्या कारवाईनंतर आता कलम 83 नुसार चौकशी होणार आहे. या चौकशीचा अहवाल आल्यानंतर कलम 88 अन्वये चौकशी होईल. या चौकशीचा अहवाल आल्यानंतर त्यात संचालकांची जबाबदारी निश्चित केली जाईल. ज्या संचालकांवर जबाबदारी निश्चित होईल त्यावेळी ते संचालक अपात्र होतील अशी माहितीही शिरापूरकर यांनी दिली.
* सोलापुरातील सहकार क्षेत्रात खळबळ, चौकशी होणार
माजी आमदार आणि शिवसेनेचे नेते दिलीप माने यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा दूध संघाचे संचालक मंडळ कार्यरत होते. आमदार संजयमामा शिंदे, आमदार प्रशांत परिचारक यांच्यासह दिग्गज मंडळी सोलापूर जिल्हा दूध संघावर संचालक म्हणून कार्यरत होते. जिल्हा दूध संघाला विविध कारणांमुळे 20 ते 22 कोटींचा तोटा झाला आहे. शिवाय संघाकडे असलेल्या निधीच्या ठेवीही संपल्या आहेत. त्यामुळे जिल्हा दूध संघाचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले आहे. संघाचा तोटा हा आजच्या संचालक मंडळाच्या कार्यकाळातीील नसून मागील 10 ते 15 वर्षांपासून संघ तोट्यात चालविला जात आहे. त्यामुळे नेमक्या कोणत्या वर्षात संघ तोट्यात गेला, याची चौकशी करण्यात येणार आहे. त्यानंतर संबंधित संचालक मंडळावर जबाबदारी निश्चित करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल.