मुंबई : ‘मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाची आम्ही गंभीर दखल घेतली आहे. त्याची चौकशीही सुरू आहे. हत्या, आत्महत्या, फाशीची दखल घेणे राज्य सरकारचे काम आहे. सचिन वाझे ओसामा बिन लादेन असल्याचे चित्र निर्माण केले जात आहे. आधी फाशी द्या, मग तपास करा, असं होऊ शकत नाही. दोषींवर कडक कारवाई होणारच. तसेच खासदार मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणाचीही चौकशी सुरू आहे’, असे मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी आज माध्यमांशी बोलताना म्हटले.
मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणावरून अधिवेशनात भाजपने आक्रमक भूमिका घेतली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्र्यांसह अनेकांवर जोरदार हल्ला केला. यावेळी अधिवेशनात सचिन वाझेंचा मुद्दा अधिक चर्चिला गेला. आज अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत सचिन वाझे प्रकरणावर आपली भूमिका मांडली.
महाराष्ट्र कधी थांबला नाही, महाराष्ट्र कधी थांबणार नाही, असे ब्रिदवाक्य आहे. अर्थसंकल्प अधिवेशन घेणे हे आव्हानात्मक होते. जनतेला दिलासा देणारा अर्थसंकल्प सादर झाला. आव्हानात महाराष्ट्र थांबला नाही. आज ते अधिवेशन संपले आहे. कोणतेही रडगाणे न गाता अर्थसंकल्प मांडला, असे उध्दव ठाकरे म्हणाले.
तसेच फाशी देऊन न्याय करा अशी पद्धत नसते. त्यांनी जर पद्धत बदलली असेल तर त्यांनी सांगावं, असा टोलाही ठाकरेंनी भाजपला लगावला. प्रत्येक गोष्टीसाठी यंत्रणा असते. एखादा गुन्हा किंवा घटना किंवा दुर्घटना घडली असेल त्याबाबत शंका असेल तर आपल्याकडे अनेक यंत्रणा आहेत. जर यांच्या यंत्रणा भारी असतील तर पोलीस यंत्रणा रद्द करायची का?, असा सवाल त्यांनी केला. वाझे पूर्वी शिवसेनेत होते. 2008 मध्ये ते सेनेत होते. त्यांनी पुन्हा सदस्यत्व घेतलेलं नाही. त्यांचा शिवसेनेशी काहीही थेट संबंध नाही. सर्व विषयात निष्पक्षपातीपणे पाहायचा चष्मा हवा. राज्य सरकारकडे जसे तारतम्य आहे, तसे विरोधकांनीही बाळगले पाहिजे, असे ठाकरे यांनी सांगितले.
मुख्यमंत्री म्हणाले, मुंबईत स्फोटकं सापडली होती, त्याचाही तपास सुरू आहे. आधी फाशी द्या आणि मग तपास करा ही पद्धत बरी नाही. सध्या ही पद्धत काही जणांनी सुरू केली आहे. सर्व तक्रारींची दखल आम्ही घेत आहोत. नवीन पद्धत आली आहे की, एखाद्याला टार्गेट करायचं आणि त्याचे थिंडवडे काढायचं. हे चुकीचं आहे. सचिन वाझे कधीतरी शिवसेनेत होते, मात्र त्यांनी शिवसेना सोडल्यानंतर त्यांचा शिवसेनेशी काहीच संबधं नाही. सचिन वाझे आमचा कोणी नेता किंवा मंत्री नव्हता. मृत्यू झाल्या नंतर त्याची दखल घेणं हे सरकारचं काम आहे. खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येनंतर तपास सुरू आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
8 ते 15 दिवसांपूर्वी पंतप्रधानांसमोर व्हर्च्युअल पद्धतीने शेतकऱ्यांच्या विषयावर एक बैठक झाली होती. पीक विम्यासंदर्भात जुनेच नियम ठेवण्यात यावेत, याबाबतही चर्चा करण्यात आली. शेतकऱ्यांच्या पाठिशी असल्याचं पंतप्रधान वारंवार सांगत आहे, ते जे म्हणत आहेत त्यांनी तसं करुन दाखवावं, ही अपेक्षा मुख्यमंत्री ठाकरेंनी व्यक्त केली.
अजित पवार यांनी महावितरण कंपनीवर बोजा वाढत चालला असल्याचे सांगितले. त्यामुळे पुढे कंपनी कशी चालणार हा प्रश्न आहे. दरम्यान अनेक सोयीदेखील देण्यात आल्या आहेत. मात्र बोजा वाढत असल्याने नाईलाजाने हा निर्णय घ्यावा लागला.
* काँग्रेसचे महाविकास आघाडीपासून दूरी का?
विशेष बाब म्हणजे अजित पवार यांनी अर्थसंकल्प मांडल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत देखील काँग्रेसचा एकही नेता उपस्थित नव्हता. पत्रकार परिषदेत महाविकास आघाडी सरकारचा भाग असलेल्या काँग्रेस पक्षाचा एकही नेता या पत्रकार परिषदेत उपस्थित नसल्याचं पाहायला मिळालं. ही पत्रकार परिषद मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची असते. मात्र, एका बाजूला अनिल देशमुख आणि दुसऱ्या बाजूला अनिल परब असे दोन अतिरिक्त मंत्री घेऊन ही पत्रकार परिषद मुख्यमंत्र्यांनी घेतली. याच्यामध्ये एकही आमदार किंवा वरिष्ठ नेता उपस्थित नव्हता. शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोनच पक्षाचे नेते या पत्रकार परिषेदत पाहायला मिळाले. त्यामुळे काँग्रेसचे महाविकास आघाडीपासून दूरी का? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.
“महाराष्ट्राच्या विधीमंडळाचं अधिवेशन संपलं असून कोरोनाच्या संकटात हे अधिवेशन व्यवस्थित पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य केलं. विरोधी पक्षानेही उत्तम सहकार्य केलं. यापूर्वी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर आम्ही तुमच्याशी संवाद साधला होता. आताच्या आवाहनात्मक परिस्थितीत सर्वसामान्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प यावेळी सादर करण्यात आला. महाराष्ट्र कधी थांबला नाही, कधी थांबणार नाही.”
उध्दव ठाकरे – मुख्यमंत्री