सोलापूर : सोलापुरातल्या अक्कलकोट तालुक्यातील तडवळ या गावात राहणाऱ्या शिवसिद्ध बुळ्ळा याच्यावर ठेवण्यात आलेले आरोप पाहून पोलिस प्रशासनही थक्क झाले आहे. त्याच्या सोलापुरातील दोन आणि अक्कलकोट तालुक्यातील तडवळ येथील एका घरात शोध घेण्यात आला. यात अनेक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांचा जात वैधता प्रमाणपत्र खोटं असल्याच्या आरोपावरुन अटक करण्यात आलेल्या शिवसिद्ध बुळ्ळा याच्या घर झडतीत सापडलेल्या कागदपत्रातून नवनवीन खुलासे होत आहेत. आरोपी शिवसिद्ध बुळ्ळा याच्या घरात आढळलेल्या एका कागदपत्राद्वारे 2015 च्या प्रकरणात देखील त्याला आरोपी करण्यात आले आहे. तर बुळ्ळाच्या घरात सापडलेल्या तीन दाखल्यांची नोंद ही तहसील कार्यालयाकडे नसल्याचं स्पष्ट झालंय. त्यामुळे आरोपी शिवसिद्ध बुळ्ळा याने असे किती दाखले तयार केलेत याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होतंय.
खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांच्या जात वैधता प्रमाणपत्राबाबत सोलापूर गुन्हे शाखा तपास करत आहे. त्यांना केवळ याच प्रमाणपत्राबाबत तपास करण्यासाठी मर्यादा आहेत. मात्र शिवसिद्ध बुळ्ळा याने नेमकं किती लोकांना बनावट कागदपत्रे बनवून दिली. आणि त्या कागदपत्रांचा वापर करुन कोण कोण शासकीय सेवेत, राजकारणात किंवा आणखी कुठे आहे याच तपास करण्याची गरज आता निर्माण झालीय.
सोलापूरच्या जात वैधता पडताळणी समितीने अवैध ठरवलेला खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांचा दाखला याच महाशयाने तयार केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. शिवसिद्ध बुळ्ळा हा सध्या न्यायालयीन कोठडीत असून वैद्यकीय कारणामुळे त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मात्र पोलिसांना चौकशीत बुळ्ळाच्या घरातून सापडलेल्या कागदपत्रातून रोज धक्कादायक माहिती समोर येत आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* 2015 च्या गुन्ह्यातही शिवसिद्ध बुळ्ळाला केले आरोपी
आरोपी शिवसिद्ध बुळ्ळा याच्या घरातून नितीन साळुंखे नावाच्या व्यक्तीचा एक दाखला आढळून आला. 2015 साली सुमारे 200 बनावट जात प्रमाणपत्र तयार केल्याप्रकरणी जात पडताळणी समितीने पोलिसात गुन्हा दाखल केला होता. या दाखल्यांपैकी एक दाखला म्हणजे नितीन साळुंखे यांचा दाखला होता.
जात पडताळणी समिती कार्यालयात काम करणाऱ्या दोघांविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात आरोपी असलेली एक महिला शिवसिद्ध बुळ्ळा याच्या मालकिच्या फ्लॅटमध्ये भाड्याने राहत होती असं पोलिस तपासात समोर आलं. त्यामुळे 2015 च्या या प्रकरणात देखील शिवसिद्ध बुळ्ळा याला आता आरोपी करण्यात आलं आहे. बुळ्ळा याची रुग्णालयातून मुक्तता झाल्यानंतर या प्रकरणात पोलिस त्याच्या कोठडीची मागणी न्यायलयाकडे करु शकतात.
या सोबतच शिवसिद्ध बुळ्ळा याची मुलगी, भावजय आणि गावातील एका व्यक्तीचे जातीचे दाखले देखील घर झडतीत सोलापुरच्या गुन्हे शाखेला मिळाले होते. मात्र जेव्हा गुन्हे शाखेने अक्कलकोट तहसीलदारांना या दाखल्याबाबत माहिती विचारली तेव्हा त्यांच्याकडे देखील या दाखल्यांसंदर्भात कोणतीच नोंद नसल्याचं देखील उघड झालंय.
* बुळ्ळानेच दाखल केली खासदाराच्या हरवलेल्या दाखल्याची फिर्याद
खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांचा जातीचा दाखला हरवल्याची तक्रार याच शिवसिद्ध बुळ्ळा यांने वळसंग पोलिस ठाण्यात दिली होती. पोलिसांना दिलेल्या अर्जात आणि खासदारांच्या दाखल्यावरील अक्षरात साम्य आढळल्याच्या संशयातून पोलिसांनी त्याला अटक केली होती. मात्र अटकेवेळी त्याच्या घरातून अक्कलकोटच्या तहसीलदारांचे शिक्के देखील आढळून आल्याचं पोलिस सुत्रांनी सांगितलंय. त्यामुळे शिवसिद्ध बु्ळ्ळा यांने या शिक्क्यांचा वापर करुन किती बनावट दाखले तयार केले असतील याचा अंदाज बांधणे देखील कठीण आहे.
खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांचा दाखला अवैध असल्याचा निर्वाळा सोलापूरच्या जात वैधता पडताळणी समितीने दिला. मात्र त्याबाबत आता उच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. मात्र या प्रकरणात आरोपी असलेल्या शिवसिद्ध बुळ्ळा याच्या घरझडतीत आढळलेल्या कागदपत्रातून धक्कादायक माहिती समोर आली आहे.