नवी दिल्ली : काँग्रेस आणि आम आदमी पक्षामध्येे दिल्लीतील जागावाटप अंतीम झाले आहे. त्यामुळे अरविंद केजरीवाल यांना येत्या दोन ते तीन दिवसांत अटक होऊ शकते, अशी भीती आपचे नेते सौरभ भारद्वाज यांनी व्यक्त केली आहे.
दिल्लीतील सात जागांपैकी तीन जागा काँग्रेस तर चार जागा आप लढवणार असल्याचे उभयपक्षी मान्य करण्यात आले आहे. आप आणि काँग्रेस यांच्यातील इंडीया आघाडीसंदर्भातील बैठक माध्यमे आणि भारतीय जनता पक्ष या दोहोंना अपेक्षित नव्हती. गृहमंत्री अमित शहा यांनी एका मुलाखतीत आप आणि काँग्रेसमध्ये युती होऊ शकत नसल्याचे म्हटले होते. ज्यावेळी आमच्यातील जागावाटपावर मोहोर लागली त्यावेळी आम्हाला महिती मिळाली की अरविंद केजरीवाल यांना सातवे समन्स मिळणार आहे. विश्वासनीय सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, केवळ ईडीच नव्हे तर सीबीआयसुध्दा अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यासाठी पावले उचलत आहे.
फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 41 ए नुसार केजरीवाल यांना नोटीस बजावण्यात येणार असून दोन तीन दिवसांत त्यांना अटक करण्यात येणार असल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे, असेही ते म्हणाले. भारद्वाज पुढे म्हणाले, आप आणि काँग्रेस एकत्र आल्यास दिल्लीत एकही जागा मिळवणे भाजपला शक्य होणार नाही. आम्ही भाजपला सांगू इच्छितो की केजरीवाल यांना हवी तर अटक करा पण भाजप आणि काँग्रेस यांची युती होणार आहे.
तुम्हाला हवे त्याप्रमाणे तुम्ही अनेक समन्स पाठवली आहेत. आमच्या प्रत्येक नेत्याला अटक करा. फासावर लटकवा… पण आम्ही तुमच्या धमक्यांना भीक घालणार नाही. देशाची घटना आणि सार्वभौमत्व यासाठी आम्ही लढत राहू आणि ते आम्ही कायमच करत राहू, असे आपच्या नेत्या आतिशी म्हणाल्या.