मुंबई / नवी दिल्ली : नेटफ्लिक्सवरील ‘बॉम्बे बेगम’ वेबसीरिज वादात सापडली. त्यातील काही सीनवर राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाने आक्षेप घेतला आहे. यात अल्पवयीन मुले लैंगिक संबंध आणि अंमली पदार्थांचे सेवन करत असल्याचे दाखवले आहे. त्यामुळे या सीरिजचे स्ट्रिमिंग त्वरित थांबवून 24 तासात सविस्तर अहवाल सादर करा, असा आदेश आयोगाने दिला आहे. यामुळे मुलांच्या शोषणाला चालना मिळू शकते, असं म्हणत नोटीस पाठविली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
चित्रपटगृहात प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांनंतर आता सरकार ओटीटी प्लॅटफॉर्मवरही बारकाईने नजर ठेऊन आहे. नुकतेच अमेझॉन प्राइमवर रिलीज झालेल्या ‘तांडव’ वेब सीरिजबाबतच्या वादानंतर, नेटफ्लिक्सवर 8 मार्च रोजी प्रदर्शित झालेली ‘बॉम्बे बेगम’ आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. यातील काही सिन्स आणि कंटेंटबाबत बाल आयोगाने आक्षेप नोंदवत नोटीस दिली. आता या प्रकरणात, नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राइट्सने नेटफ्लिक्सला 24 तासांत अहवाल सादर करण्यास सांगितले असून, या वेब सीरिजचे प्रसारण थांबविण्याचा आदेश दिला आहे.
* 24 तासात करा सविस्तर कृती अहवाल सादर
राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोग म्हणजेच NCPCR ही बाल हक्कांच्या संरक्षणासाठी सर्वोच्च संस्था आहे. एनसीपीसीआरने ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सला 24 तासात सविस्तर कृती अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. त्यांनी तसे न केल्यास त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल असेही आयोगाने सांगितले आहे. कमिशनने आपल्या नोटीसमध्ये म्हटले आहे की, नेटफ्लिक्सने मुलांच्या बाबतीत किंवा मुलांसाठी कोणताही कंटेंट प्रसारित करताना अतिरिक्त काळजी घ्यावी.
* अल्पवयीन मुलांचा कॅज्यूअल सेक्स आणि ड्रग्ज सेवन
दिग्दर्शक अलंकृता श्रीवास्तव यांची वेबसिरीज ‘बॉम्बे बेगम’ मध्ये पाच वेगवेगळ्या महिलांची कहाणी दाखवण्यात आली आहे. यामध्ये पूजा भट्ट, सुहाना गोस्वामी, अमृता सुभाष, प्लाबिता बोर-ठाकूर, अधिया आनंद यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
यात एका 13 वर्षांच्या मुलीला ड्रग्स घेताना दाखवण्यात आले आहे. तसेच या सिरीजमध्ये अल्पवयीन मुलांचा कॅज्यूअल सेक्सही दाखवण्यात आला आहे. यासह ज्या प्रकारे शालेय मुलांचे चित्रण केले गेले आहे त्यावरही आक्षेप घेण्यात आला आहे. तक्रारीतील कथित अनुचित चित्रणावर आक्षेप घेताना, या प्रकारचा कंटेन केवळ तरुण लोकांच्याच मनावरच परिणाम करत नाही तर, यामुळे मुलांचे शोषण देखील होऊ शकते असे म्हटले आहे.