मुंबई : अखेर मुंबईचे पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. तसेच हेमंत नगराळे यांना मुंबईचे नवीन पोलिस आयुक्त बनवण्यात आले आहे. तर परमबीर सिंह यांना गृहरक्षक दलाची जबाबदारी देण्यात आली.
मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटके आढळल्याप्रकरणी पोलिस अधिकारी सचिन वाझे यांना अटक करण्यात आली आहे. त्यानंतर परमबीर सिंह यांना पोलिस आयुक्त पदावरून हटवण्याची मागणी केली जात होती. सचिन वाझे प्रकरणामुळे महाविकास आघाडी सरकारला विरोधकांकडून लक्ष्य केलं जात आहे. तसेच या प्रकरणामुळे सरकारची बदनामी होत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. तसेच मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना पदावरून हटवण्याची मागणीही त्यांनी केल्याची माहिती पुढे आली होती. त्यामुळे अखेर आज पवारांची नाराजी परमबीर सिंह यांना भोवली आहे. त्यांची या पदावरून उचलबांगडी झाली आहे. त्यांच्या जागी राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सध्या एनआयएच्या (NIA) अटकेत असलेले मुंबई पोलीस दलातील निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांच्या स्फोटकेप्रकरणात महाराष्ट्र पोलीस दलात ही मोठी घडामोड घडली आहे. मागच्या आठवड्यात शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर मागील दोन ते तीन दिवसांपासून परमबीर सिंह यांची उचलबांगडी होणार अशी जोरदार चर्चा होती. ती अखेर खरी ठरली आहे. महत्त्वाचं म्हणजे परमबीर सिंह यांना साईडलाईन करण्यात आलं आहे. त्यांना होमगार्ड म्हणजेच गृहरक्षक दलाची जबाबदारी देण्यात आली आहे.
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विटरवरून दिलेल्या माहितीनुसार पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांची मुंबई पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर रजनीश शेठ यांच्याकडे पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य या पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. तर संजय पांडे यांच्याकडे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची जबाबदारी देण्यात आली आहे. परमबीर सिंह यांच्याकडे गृहरक्षक दलाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट झाली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबतच्या या बैठकीत शरद पवार यांनी मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरून परमबीर सिंह यांना पदावरून हटवण्याची आग्रही मागणी केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली होती. मनसुख हिरेन मृत्युप्रकरणात परमबीर सिंह यांनी सचिन वाझे यांची पाठराखण होत असल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने केला जात आहे. याचा मोठा फटका सरकारच्या प्रतिमेला बसत आहे. त्यामुळे परमबीर सिंह यांचा राजीनामा घेतला जावा, असा राष्ट्रवादी काँग्रेसचा आग्रह असल्याचं सांगितलं जातं आहे.
* हेमंत नगराळे यांची कारकीर्द
– हेमंत नगराळे नवी मुंबईचे पोलीस आयुक्त असताना देशभर गाजलेल्या वाशीतील बँक ऑफ बडोदा दरोड्याची उकल अवघ्या दोन दिवसात केल्याने त्यांचे कौतुक झाले होते. 17 वर्षांखालील फुटबॉल विश्वचषक स्पर्धा, पॉप गायक जस्टीन बिबरच्या कार्यक्रमात चांगली कायदा-व्यवस्था ठेवल्याने त्यांना शाबासकीची थाप मिळाली होती. कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे निलंबन, बडतर्फी, बदली करण्यातही ते अग्रेसर होते.
* हेमंत नगराळे मुंबईचे पोलिस आयुक्त
– हेमंत नगराळे होणार नवे मुंबई पोलिस आयुक्त
– रजनीश शेठ यांच्याकडे पोलिस महासंचालक महाराष्ट्र राज्य या पदाचा अतिरिक्त कार्यभार
– संजय पांडे यांच्याकडे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची जबाबदारी
– परमबीर सिंह यांच्याकडे गृहरक्षक दलाची जबाबदारी