जळगाव : राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच असा अजब योगायोग पाहायला मिळाला आहे. पत्नी महापौर तर विरोधी पक्षनेतेपद पतीकडे गेले आहे. जळगावात हा योगायोग घडला आहे. भाजपच्या 27 बंडखोर नगरसेवकांच्या जोरावर जयश्री महाजन या शिवसेनेच्या महापौर झाल्या आहेत. त्यांचे पती सुनील महाजन हे विद्यमान विरोधी पक्षनेते आहेत.
भाजपच्या 27 नगरसेवकांना गळाला लावून जळगावातील महापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने मिळवलेला विजय सध्या राज्यभरात चर्चेचा विषय आहे. सांगलीपाठोपाठ जळगावात झालेला हा ‘करेक्ट’ कार्यक्रम भाजपसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. मात्र, या राजकीय उलथापालथीनंतर जळगावात एक ‘अजब’ राजकीय समीकरण पाहायला मिळत आहे.
राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच पत्नीकडे महापौरपद तर पती विरोधी पक्षनेता, अशी स्थिती निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे महापौरपद आणि विरोधी पक्षनेतेपद एकाच पक्षाकडे येण्याचा योगायोगही यानिमित्ताने जुळून आला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* भाजपचा सहज पराभव
ही भाजपसाठी मोठी नाचक्की मानली जात आहे. महापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या जयश्री महाजन यांनी भाजपच्या प्रतिभा कापसे यांचा सहज पराभव केला होता. या निवडणुकीत बहुमतसाठी 38 मतांची गरज होती. जयश्री महाजन यांनी 45 मते मिळाली. तर भाजपच्या प्रतिभा कापसे यांना 28 मते मिळाली होती.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजप नेते गिरीश महाजन यांच्याकडे जळगाव महापालिकेची जबाबदारी सोपवली होती. मात्र, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि गुलाबराव पाटील यांनी राजकीय डावपेच आखत भाजपच्या 27 नगरसेवकांना आपल्याकडे ओढण्यात यश मिळवले होते.
* भाजपच्या नगरसेवकांची बेचैनी हेरली
पालिकेत सत्ता आल्यानंतरही जळगाव पालिकेला भाजपच्या काळात निधी मिळाला नाही. आताही वर्षभरात केंद्राचा निधी वगळता जळगाव पालिकेला निधी मिळाला नाही. त्यातच कोरोनामुळे पालिकेला आर्थिक चणचण भासत आहे. या पार्श्वभूमीवर नगरसेवक बेचैन होते. भाजपच्या नगरसेवकांची हीच बेचैनी हेरून शिंदे-पाटील यांनी या नगरसेवकांभोवती जाळं फेकलं आणि त्यात हे नगरसेवक सापडल्याचा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे.