मुंबई : माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी शिवबंधन सोडत अखेर शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ केला आहे. महाविकास आघाडीचे सरकार येवून दीड वर्ष होत आले, तरी माथाडी कामगारांचे प्रश्न मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सोडविलेले नसल्याचं त्यांनी बोलून दाखवलं.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे बैठकीबाबत वेळ मागूनही ते भेटत नाहीत. यामुळे आपण शिवसेनेला जय महाराष्ट्र करण्याचा निर्णय घेतला असल्याचे माथाडी कामगार नेते आणि माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी जाहीर केलं.
नरेंद्र पाटील यांनी लोकसभेची निवडणूक सातारा मतदार संघातून शिवसेना उमेदवार म्हणून लढवली होती आज माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांच्या जयंती निमित्त घेतलेल्या कार्यक्रमात नरेंद्र पाटील यांनी शिवसेना सोडण्याची घोषणा केली आहे.
विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे आपले जिव्हाळ्याचे संबंध असून ते शिवसेना नेत्यांच्या डोळ्यात खुपत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मी शिवसेनेत राहू नये अशीच पक्षातील नेत्यांची इच्छा असल्याने आपण नाईलाजास्तव शिवसेना सोडत असल्याचे नरेंद्र पाटील यांनी सांगितले आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
माथाडी चळवळ मोठी असून या चळवळीचे प्रश्न समजून घेऊन खालच्या मंत्र्यांना त्यांनी आदेश देणे गरजेचे होते. पण माथाडीच्या प्रश्नासाठी त्यांनी कधी वेळच दिला नाही. त्यामुळे माझी मुख्यमंत्र्यांकडे नाराजी आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले की माझ्यावर शिवसेनेचे नरेंद्र पाटील अशी टीका होते. लोकसभेच्या निवडणूकीत शिवसेनेत का गेलो याचे कारण मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व देवेंद्र फडणवीस यांना माहिती आहे.
माझे बोलणे केवळ फक्त एकनाथ शिंदे यांच्याशी होते. त्यामुळे मलाही वाटते आपण अलिप्त राहिलेले बरे. त्यांनाही टीका टिपणी नको सामान्य शिवसैनिकांनाही नाराजी नको, तर नेत्यांना फरक पडत नाही. देवेंद्र फडणवीस यांच्या विचारांचा कट्टर कार्यकर्ता आहे. काय करायचे काय नाही हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे.
* उदयनराजेंना मिठी मारुन केलेल्या वक्तव्याने बसला अनेकांना धक्का
बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील खेड शिवापूर येथे खासदार उदयनराजे भाेसले आणि शिवसेनेचे नेते नरेंद्र पाटील यांची भेट झाली. वाई येथील दाैरा संपवून नरेंद्र पाटील हे मुंबईला जात असताना खेड शिवापूरजवळ त्यांना खासदार उदयनराजेंची गाडी उभी असलेली दिसली. पाटील यांनी चालकास गाडी जवळ थांबण्याची सूचना केली. यावेळी पाटील हे गाडीतून उतरुन उदयनराजेंच्या दिशेने गेले. त्याचवेळी उदयनराजेंनी त्यांच्याकडे जात मिठी मारली.
या भेटीत पाटील हे माेठमाेठ्याने हसत महाराज साहेब, साहेब आता मुख्यमंत्री होताहेत. काळजी नाही आता, असं म्हणाले. त्यावेळी उदयनराजेंनी पुन्हा पाटील यांना मिठी मारली. दरम्यान सेनेत असणा-या पाटील यांच्या वक्तव्याने परिसरात असलेल्यांना धक्काच बसला. पाटील यांच्या या विधानामुळे महाराष्ट्रात नवीन राजकीय समीकरण हाेणार आहेत की आहे अशी चर्चाही रंगू लागली आहे.