सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे ज्येष्ठ नेते, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष डी. एन. गायकवाड यांचे कोरोना या आजाराने आज मंगळवारी दुपारी निधन झाले.
रविवारी त्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने त्यांना सोलापूर मार्कंडेय सहकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन भाऊ, भावजया, वडील असा परिवार आहे.
उपचारादरम्यान मंगळवारी दुपारच्या सुमारास त्यांचे निधन झाले. आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते व दक्षिण सोलापूर तालुक्यातील एक मोठं राजकीय व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख होती. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष म्हणून सध्या त्यांच्याकडे जबाबदारी होती.
* २० वर्षे सरपंच, दहा वर्षे बाजार समितीचे संचालक
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे दहा वर्षे ते संचालक होते. बक्षीहिप्परगे गावचे २० वर्षे त्यांनी सरपंच पद भूषवले आहे. त्याचबरोबर त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी बक्षीहिप्परगे येथे राज्यस्तरीय परिवर्तन व्याख्यानमालेचे आयोजन करत होते. या व्याख्यानमालेच्या माध्यमातून त्यांनी शाहू, फुले, आंबेडकर लोकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला.