सोलापूर / पंढरपूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या मृत्यूनंतर त्यांचे पुत्र आणि श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचेे अध्यक्ष भगीरथ भालके यांनी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी वेगाने तयारी चालू केली आहे. उमेदवारी निश्चित मिळेल अशा खात्रीने प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन भगीरथांनी प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे.
पंढरपूर येथील जिल्हा न्यायालयाच्या शेजारी असलेल्या बंगल्यावर भगीरथ भालके यांनी प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेतली होती. या बैठकी दरम्यान भगीरथांनी केलेल्या वक्तव्यानुसार भारतनाना 11 वर्ष आमदार असताना त्यांनी कोणालाही त्रास दिलेला नाही. एवढचं नाही तर एका व्यक्तिने जरी आपण त्रास दिलेलं दाखवून दिलं तर उमेदवारी अर्ज भरणार नसल्याचं भगीरथ भालकेंनी म्हटलं आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
बैठकीमध्ये वक्तव्य करत असताना एखादी गोष्ट चांगली झाली नाही तरी चालेल परंतु कोणाच्याही भावना दुखवता कामा नाही, अशी भारतनानांची शिकवण असून त्यांचा रक्ताचा वारस बनण्यापेक्षा त्यांच्या विचारांचा वारस बनून काम करुयात, असं भगीरथ भालके यांनी म्हटलं आहे.
* चार दिवसात 55 बैठका
पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघातून राष्ट्रावादी काँग्रेसची उमेदवारी अद्दाप अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र भगीरथांना असलेल्या विश्वासावर ही बैठक घेण्यात आली होती. एवढचं नाही तर गेल्या चार दिवसात मंगळवेढा शहरात एकून 55 बैठका घेण्यात आल्या आहेत.