सोलापूर : सोलापुरातील श्री मार्कंडेय सहकारी रुग्णालयात ऑक्सीजनच्या टाकीचा स्फोट झाल्याने एकच खळबळ उडाली. रात्री 11 च्या सुमारास रुग्णालयात असलेल्या दोन टाक्यांपैकी एका टाकीचा स्फोट झाला. त्यामुळे संपूर्ण रुग्णालयाच्या आसपासच्या परिसरात टाकीतील केमिकलयुक्त पावडर पसरली. मात्र हा स्फोट इतका भीषण होता की अनेकांना मानसिक धक्का बसला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तात्काळ धाव घेत आग आटोक्यात आणली.
रुग्णाला भेटायला आलेल्या नातेवाइकाचा स्फोटाच्या धक्क्यामुळे मृत्यू झाला. याबाबत मृत व्यक्तीच्या मृत्यूस सर्वस्वी रुग्णालय प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप मृत हनुमंत क्षीरसागर यांच्या नातेवाइकांनी केला आहे.
दरम्यान, हनुमंत क्षीरसागर यांच्या नातेवाइकांनी हनुमंत यांचा मृत्यू सिलिंडरच्या स्फोटामुळेच झाल्याचा आरोप केला असून, संपूर्ण नुकसानभरपाई रुग्णालया प्रशासनाने द्यायला हवी, अशी मागणी करत त्यांनी जेलरोड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. प्राथमिकदृष्टया केमिकल रिॲक्शनमुळे टाकीचा स्फोट झाला असण्याची शक्यता अग्निशमन दलाचे प्रमुख केदारनाथ आवटे यांनी व्यक्त केली.
रुग्णालयाच्या आवारात असलेल्या ऑक्सिजन प्लांटमध्ये दोन मोठ्या टाक्या आहेत. त्यापैकी एक टाकी मागील काही दिवसांपासून बंद होती. तर दुसऱ्या टाकीतून रुग्णालयास ऑक्सीजन पुरवठा सुरु होता. बंद असलेल्या टाकीमध्ये अचानक ठिणगी येत असल्याचे काही जणांनी पाहिले. मात्र कोणालाही माहिती कळवण्याआधीच भीषण असा स्फोट झाला. प्लांटच्या बाजूला रुग्णांच्या नातेवाईंकासाठी प्रतिक्षालय आहे. या ठिकाणी असलेल्या अनेकांना याचा धक्का बसला. मागील बाजूस असलेल्या दरवाजाने या ठिकाणातील सर्व नागरिक बाहेर पळून आले. मात्र या स्फोटामुळे ऑक्सिजन निर्मितीसाठी टाकीत असलेली केमिकलयुक्त पावडर सर्वत्र पसरली होती. रात्री उशिरापर्यंत रुग्णालयात साफसफाईचे काम सुरुच होते.
* महापालिका आयुक्तांची रात्रीच भेट
या घटनेची माहिती मिळताच अग्मिशमन दलाचे दोन पाण्याचे बंब घटनास्थळी दाखल झाले. पाण्याचा मारा करत आग आटोक्यात आणण्यात आली. पालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर, उपायुक्त धनराज पांडे यांच्यासह परिसरातील नगरसेवकांनी घटनास्थळी धाव घेऊन परिसराची पाहणी केली. स्फोटामुळे रुग्णांचे नातेवाईक घाबरलेल्या परिस्थितीत होते. मात्र अधिकाऱ्यांनी स्वत: जाऊन सर्व रुग्णांच्या ऑक्सिजनची पातळी तपासली. नव्या टाकीद्वारे ऑक्सिजन पुरवठा व्यवस्थित होत असल्याने कोणतीही इजा या घटनेत झाली नाही.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* चौकशी करुन दोषीवर कारवाई
स्फोट झालेल्या ठिकाणाच्या जवळ असलेल्या एका वॉर्डात केमिकलयुक्त पावडर मोठ्या प्रमाणात पसरल्याने तेथील रुग्णांना दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आलं. विशेष म्हणजे या रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांवर देखील उपचार केले जातात. मात्र सुदैवाने एक मोठी दुर्घटना टळली आहे. दरम्यान हा प्रकार नेमका कशामुळे घडला? सुरक्षेच्या नियमांचे पालन होत होते का याची चौकशी करुन जर कोणी दोषी आढळले तर त्यांच्यावर कारवाई करु असा इशारा पालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिला. तर सर्व रुग्ण सुखरुप असून कोणतीही इजा झाली नसल्याचे स्पष्टीकरण पालिका उपायुक्त धनराज पांडे यांनी दिले.
* मृत्यूबाबत रुग्णालयाचे मत
मार्कंडेय रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. माणिक गुर्रम यांनी सांगितले, की मागच्या आठवड्यात आम्ही नवीन ऑक्सिजन टँक घेतले आहे आणि त्याच टँकमधून आम्ही ऑक्सिजन घेतो. जुन्या ऑक्सिजन टँकमध्ये जो स्फोटा झाला त्यामुळे त्यातून पावडर बाहेर पडली व ती सर्वत्र पसरली. त्या वेळी आम्ही आयसीयूमधून पेशंटना बाहेर काढले. तेव्हा लक्षात आले, की हनुमंत क्षीरसागर हा येथे ऍडमिट रुग्णाचा नातेवाईक तेथे थांबलेला होता. त्या वेळी तो बेशुद्ध दिसला. स्फोटाच्या आवाजामुळे बेशुद्ध झाला असेल की कशामुळे ते माहीत नाही. आमच्या लोकांनी त्याला लगेच आयसीयूमध्ये शिफ्ट केले. त्याच्यावर उपचार करण्याचा प्रयत्न केला मात्र तो रुग्ण जो आमच्याकडे ऍडमिट नव्हता मात्र रुग्णाला भेटायला आला होता, तो मरण पावला. याबाबत आम्ही पोलिसांना त्वरित कळवलं व एमएलसी केलेली आहे.
दुसरा रुग्ण सुनील लुंगारे हा पोस्ट कोव्हिड होता. त्याच्यावर अनेक प्रकारचे उपचार केल्यानंतरही त्याची गंभीर परिस्थिती होती. तो काल मरण पावला. या दोन घटना काल घडल्या मात्र त्याचा संबंध ऑक्सिजन सिलिंडर स्फोटाशी नाही. दुसरा हनुमंत क्षीरसागर ही व्यक्ती जी रुग्णाला पाहण्यासाठी आलेली होती, मात्र आमच्या रुग्णालयात ऍडमिट नव्हती तिच्या मृत्यूचे कारण पोस्टमॉर्टेम नंतर समजून येईल.