सोलापूर : मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालयात झालेल्या ऑक्सिजन टाकीच्या स्फोटाच्या तपासासाठी केंद्र सरकारच्या मुंबईतील पेट्रोलियम अँड एक्स्प्लोजिव्ह सेफ्टी ऑर्गनायझेशनचे उपनियंत्रक अरुण क्षीरसागर सोलापुरात दाखल झाले. त्यांनी चौकशी समिती सदस्यांसह घटनास्थळाची पाहणी करुन माहिती घेतली.
दरम्यान या पथकाआधी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शनिवारी या रुग्णालयाला भेट देऊन घटनेची माहिती घेतली. पत्रकारांशी बोलताना त्यांनी स्फोटाचे कारण नियुक्त केलेल्या समितीच्या अहवालानंतरच स्पष्ट होईल. तोपर्यंत आपल्याला वाट पहावी लागेल, असे सांगितले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मार्कंडेय रुग्णालयात झालेल्या स्फोटाच्या पार्श्वभूमीवर पेट्रोलियम अँड एक्स्प्लोजिव्ह सेफ्टी ऑर्गनायझेशनचे उपनियंत्रक अरुण क्षीरसागर यांनी शनिवारी मार्कंडेय रुग्णालयाला भेट दिली. यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हाधिकाऱ्यांनी नेमलेल्या समितीचे सदस्य असलेले औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाचे प्रमोद सुरसे, केमिकल इंजिनिअर्सचे सेफ्टी ऑडिटर अमर जेऊरकर उपस्थित होते.
यावेळी या पथकाने रुग्णालयाच्या ऑक्सिजन प्लान्टचे कर्मचारी, प्लान्टचे मक्तेदार, रुग्णालयाचे संचालक व प्रशासनाकडून स्फोटासंदर्भात माहिती घेतली. या माहितीच्या आधारे अभ्यास करुन येत्या काही दिवसांत स्फोटासंदर्भात निष्कर्ष काढणार आहेत.