सोलापूर : पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. समाधान महादेव आवताडे यांना भाजपकडून या मतदारसंघासाठी उमेदवारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके याच्या मृत्यूनंतर रिक्त असलेल्या पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाची पोटनिवडणूक चांगलीच चुरशीची होणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भारत भालके यांचे 27 नोव्हेंबर 2020 रोजी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाची जागा रिक्त झाली. त्यानंतर भाजपने राजकीय डावपेच आखाण्यास सुरुवात केली होती. त्यासाठी येथील भाजप नेते प्रशांत परिचारक यांच्या गटाची नुकतीच बैठक झाली.
दरम्यान, या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीकडून भालके कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी जवळपास निश्चित आहे. मात्र शिवसेना व स्वाभिमानीने बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. शिवाय वंचित बहुजन आघाडी, एमआयएम या पक्षासह अभिजित बिचकुलेसारखे अनेक अपक्ष उमेदवारही रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे या निवडणुकीत मोठी रंगत निर्माण होणार आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
पंढरपूर- मंगळवेढा पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवार असलेले समाधान आवताडे यांनी 2014 साली शिवसेनेकडून निवडणूक लढवली होती. तर 2019 ला ते अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. दोन्ही निवडणुकीत त्यांना जवळपास 60 हजार मते पडली होती.
समाधान आवताडे हे उद्योजक आहेत. या पोट निवडणुकीत भाजपा कडून आ. प्रशांत परिचारक व समाधान आवताडे यांच्या उमेदवारीसाठी मोठी चुरस होती. मात्र भाजपच्या वरिष्ठांनी परिचारक यांना थांबविण्यात यश मिळविले आहे. आमदार परिचारक गटाने समाधान अवताडे याना पाठिंबा देण्याचे मान्य करत पंढरपुर शहरासह 22 गावांतून मताधिक्य देण्याचा शब्दही पक्षश्रेष्ठींना दिला आहे. त्यामुळेच आवताडेंना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांनी समाजमाध्यमावर आभारही मानले आहेत.
आवताडे यांनी 2014 ला शिवसेनेकडून निवडणूक लढवली होती. तर 2019 ला ते अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. समाधान आवताडे हे उद्योजक आहेत. समाधान आवताडे यांना आमदार परिचारक गटाने पाठिंबा दिल्याने त्यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे.
* मंगळवारी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी बडे नेत्यांची राहणार उपस्थिती
परिचारक अन् आवताडे यांचे मनोमिलन करण्यात यश मिळाल्यानंतर आवताडे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मंगळवारी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सुभाष देशमुख, आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, आमदार प्रशांत परिचारक, आमदार राजा राऊत यांच्यासह बडे नेते उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर भाजपचा मेळावा होण्याचीही शक्यता आहे. तशी तयारी केली जात असल्याचे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.