सातारा : कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना प्रशासनाने नागरिकांना कडक निर्बंध लागू केले आहेत. यात्रा – जत्रा धार्मिक कार्यक्रम आयोजनावर बंदी घातली असताना वाई येथील बावधन बगाड यात्रेला हजारोंच्या संख्येने भाविकांची गर्दी केली आहे.
कोरोनाचे नियम मोडून बगाडाचे आयोजन केल्याने गुन्हा दाखल केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. बगाडाच्या ठिकाणी १० ते १५ पोलिसांचा बंदोबस्त आहे. अनेकांनी विनामास्क यात्रेत हजेरी लावली असून मोठ्या प्रमाणात कोरोना वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे.
वाई तालुक्यातील बावधन येथील बगाड यात्रा राज्यात प्रसिद्ध आहे. या वर्षी कोरोनो रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून वाईच्या प्रांताधिकारी संगीता चौगुले राजापूर कर यांनी १४४ कलम लागू करुन बगाड यात्रेवर बंदी घातली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने जिल्हा प्रशासनाने यात्रा-जत्रावर बंदी घातली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
आज 2 एप्रिल रोजी वाई तालुक्यातील बावधन येथील बगाड यात्रा होती. या यात्रेवर ही जिल्हा प्रशासनाने बंदी घातली होती. मात्र ही बंदी झुगारून येथील ग्रामस्थांनी हजारोच्या संख्येने एकत्र येत बगाड यात्रा उत्साहात साजरी केली.
आज प्रशासनाची बंदी झुगारून बावधन गावच्या हजारो ग्रामस्थांनी एकत्र येत पहाटे तीन वाजल्या पासून पोलिस प्रशासनाला हुलकावणी देऊन सोनेश्वर येथील कृष्णा नदी काठावर विधीवत पुजा करुन पोलिस महसूल प्रशासनाच्या साक्षीने शेकडो बैल जोड्या लावून काशिनाथाचे चांगभलच्या गजरात बगाड काढले.
पिढ्यान पिढ्या चालत आलेली बगाडाची परंपरा येथील युवा शक्तीच्या ताकतीने अखंडित ठेवली. या आधी ब्रिटिश सरकारने आणि ब्रिटिश पोलिस प्रशासनाने देखील पिढ्यान पिढ्या येथील बगाड यात्रेला बंदी घातली होती पण त्याही वेळेस संपूर्ण बावधन गावातील ग्रामस्थांनी एकत्र येऊन मनगटाच्या ताकतीवर ब्रिटिश सरकारने घातलेल्या बंदीला झुगारुन बगाड यात्रा साजरी करुन दाखवली होती. त्याचा प्रत्यय आजच्या यात्रेतही आला. आता जिल्हा प्रशासन कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.