मुंबई / सोलापूर : प्रादेशिक परिवहन विभागातील निलंबित मोटार वाहन निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी विभागात होत असलेल्या अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार, बदल्यांमधील आर्थिक व्यवहार, अनियमितता याबाबत पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यामुळे आता परिवहन मंत्री अनिल परब यांच्या पाठोपाठ सोलापुरात काम केलेले आरटीओ अधिकारी आता नागपूर ग्रामीणच्या प्रादेशिक परिवहन विभागामधील उप परिवहन अधिका-यांच्या घरावर ईडीने छापे टाकले आहेत.
परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासह या आरटीओ अधिका-यांचंही नाव आहे. हे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी परब यांच्या अत्यंत जवळचे अधिकारी असल्याचे आरोप होत आहेत. त्यामुळंच ईडीनं यांच्या घरावर छापा टाकला असल्याचं वृत्त आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अनिल परब यांच्या प्रकरणाशी संबंधीत नागपूरमध्ये ईडीने छापासत्र सुरू केले आहे. नागपूर ग्रामीणच्या प्रादेशिक परिवहन विभागामधील उप परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे यांच्या कार्यालयात व घरी ईडीने कारवाई केली आहे. बजरंग खरमाटे हे अनिल परब यांच्या जवळचे अधिकारी समजले जातात.परंतु, दुसरीकडे, परीवहन मंत्री यांच्या संबधीत कोणत्याही ठिकाणांवर ED च्या धाडी पडलेल्या नाहीत. अनिल परब यांच्या संबंधित कोणत्याही ठिकाणार ED च्या धाडी पडलेल्या नाही आहेत’ असं परब यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची ईडीकडून मनी लाँर्डींग प्रकरणात चौकशी केली जात आहे. आता याच प्रकरणात ईडीकडून अनिल परब यांचीही चौकशी सुरू केली आहे. परब यांना ईडीनं रविवारी नोटीस पाठवली असून आज सोमवारी खरमाटे यांच्या घरासह तीन ठिकाणी छापे टाकले. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून परब यांच्या अडचणी वाढल्याची चर्चा आहे. गजेंद्र पाटील यांनी केलेल्या तक्रारीमध्ये परब यांच्यासह खरमाटे यांचंही नाव घेण्यात आलं आहे.
खरमाटे यांचे नाशिक कनेक्शन समोर आलं आहे. आरटीओ विभागातील बदल्या आणि पदोन्नतीसंदर्भात ईडीने छापेमारी केली आहे. खरमाटे हे परब यांच्या जवळचे मानले जात असल्यानं त्यांचा परिवहन विभागात सतत राबता असायचा. बजरंग खरमाटे हे सोलापूर येथे असताना दोन वेळा निलंबित झाले होते. बदली व पदोन्नतीसाठी त्यांच्या मुंबई व पुण्यात सतत फेऱ्या होत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. याअनुषंगाने खरमाटे हे ईडीच्या रडारवर आले आहेत.
* या अधिका-यांचीही नावे
गजेंद्र पाटील यांनी केलेल्या तक्रारीमध्ये परब यांच्यासह खरमाटे, परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे, उप परिवहन आयुक्त जितेंद्र कदम, उपसचिव प्रकाश साबळे, परिवहन विभागाचे अवर सचिव डी. एच. कदम, प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांची नावे घेण्यात आली होती. पाटील यांच्या तक्रारीनंतर नाशिकच्या पोलिस आयुक्तांकडून चौकशी समितीही नेमण्यात आली होती. नाशिकच्या हद्दीत असा कोणताही गुन्हा घडला नसल्याचा अहवाल आयुक्तांना देण्यात आला होता.