ठाणे : ठाणे महापालिकेच्या माजीवडा प्रभागाच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर एका फेरीवाल्याने प्राणघातक हल्ला केला. यात पिंपळे यांची तीन बोटं तुटली आहेत तसेच त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. दरम्यान, पिंपळे या आज कासारवडवली भागात अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करत होत्या. त्यावेळी एका फेरीवाल्याने त्यांच्यावर धारधार शस्त्राने हा जीवघेणा हल्ला केला. ही घटना आज सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली.
या हल्ल्यात वाचविण्यासाठी पुढे आलेला त्यांचा अंगरक्षकही जखमी झाला आहे. पिंपळे यांच्या हाताची तीन बोटे तर अंगरक्षक याचे एक बोट हल्ल्यात तुटून हातापासून वेगळी झाले आहे. त्या दोघांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, त्यांच्या हाताची बोटे जोडण्याची शस्त्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. हा हल्लाखोर फेरीवाला यादव याला पोलिसांनी अटक केली आहे.
महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्या आदेशानुसार अनधिकृत बांधकाम, फेरीवाले आणि हातगाड्यांवर सद्यस्थितीत सर्वच प्रभाग समितीमध्ये कारवाई सुरू आहे. त्यानुसार माजीवडा मानपाडा प्रभाग समितीच्या सहायक आयुक्त पिंपळे या कासारवडवली भागातील मार्केट परिसरात अनधिकृत तसेच रस्ता किंवा पदपथ अडविणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी गेल्या होत्या.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
कारवाई सायंकाळी ६.३० च्या सुमारास सुरु असतानाच संतप्त झालेल्या यादव या फेरीवाल्याने, रागाच्या भरात पिंपळे यांच्यावर चाकूने डोक्यावर हल्ला चढवला, पण त्यांनी हात डोक्यावर ठेवल्याने त्या हल्ल्यात हाताची तीन बोटे कापली गेली आहेत. याचदरम्यान त्यांचा अंगरक्षक त्यांना वाचविण्यासाठी पुढे आल्यावर त्याच्याही एक बोटाला दुखापत झाली आहे.
परप्रांतीय फेरीवाला यादवला पोलीस पकडण्यासाठी पुढे येत असल्याचे पाहून तोच चाकू आपल्या गळ्यावर ठेवून त्यांना धमकवण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्याला मोठ्या शिताफीने अखेर पकडले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. तसेच जखमींना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
“हा प्रकार अतिशय धक्कादायक आणि गंभीर आहे, दुर्दैवी आहे. कारण, एका महिला अधिकाऱ्यावर अशा प्रकारचा अमानुष हल्ला होणं, हे अतिशय चुकीचं आहे. आपलं कर्तव्य बजावत असताना हा हल्ला केला गेला आहे. प्रशासन व सरकार सहायक आयुक्त पिंपळे यांच्या पाठीशी आहे. हल्लेखोरास अटक केलीय. मी पोलीस आयुक्त, मनपा आयुक्त यांच्याशी बोललो आहे. कठोर कारवाई याप्रकरणी झाली पाहिजे”
एकनाथ शिंदे, पालकमंत्री – ठाणे