सोलापूर : शहर पोलिस आयुक्तालयातील गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शहर परिसरात घरफोडी आणि दुचाकीची चोरी करणाऱ्या दोन आरोपींना नुकतीच अटक केली. त्यांच्याकडून ८ घरफोडीचे तर ३ दुचाकी चोरीचे असे एकूण ११ गुन्हे उघडकीस आणले. त्या सर्व गुन्ह्यातील दागिन्यासह २ लाख ५६ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे .
त्यापैकी पहिल्या आरोपीचे नाव सचिन इरप्पा धोत्रे (वय२० रा. केकडे नगर, एमआयडीसी, सोलापूर) असे आहे. त्याच्या ताब्यातून ९५ हजार रुपये किमतीचे २६ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि ७५ हजार रुपये किमतीच्या तीन दुचाकी जप्त करण्यात आले. एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत धोत्रे आणि त्याच्या सहकाऱ्या ने मिळून जून ते जुलै महिन्यात तीन घरफोड्या केल्या. तर लांबोटी येथील ढाब्या समोरून २ तर शेळगी परिसरातून एक असे ३ दुचाकी चोरल्याचे निष्पन्न झाले. त्याला सहाय्यक पोलिस निरीक्षक संजय क्षीरसागर यांच्या पथकाने अटक करून गुन्हे उघडकीस आणले.
तर दुसऱ्या आरोपीचे नाव शशिकांत उर्फ पिल्ल्या अनिल राक्षे (वय ४३ रा.तांब्री, सम्राट चौक, उस्मानाबाद) असे आहे. याला गुन्हे शाखेतील सहाय्यक निरीक्षक निखिल पवार यांच्या पथकाने अटक केली. त्याने सदर बाजार सदर, फौजदार चावडी, विजापूर नाका आणि एमआयडीसी परिसरात पाच घरफोड्या केल्याचे निष्पन्न झाले. त्याच्या ताब्यातून ८६ हजाराचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त करण्यात आले.
* बार्शी शहर पोलिसांनी 48 तासांत दुकान फोडणारे आरोपी पकडले
बार्शी : बार्शी शहर पोलिसांनी आपल्या तपासकामातील कमाल कौशल्य दर्शवित शहरातील मध्यवर्ती भागातील सात दुकाने फोडणारे चार आरोपी अवघ्या 48 तासांत पकडले आहेत. पकडलेले आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वीही अशाच प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी काही आरोपी हद्दपार झालेले आहेत. तर काही इतर पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात वॉंटेड आहेत.या आरोपींनी दोन दिवसात बार्शी बरोबरच बारामती, कुर्डवाडी, टेंभुर्णी आदी शहरातही दरोडे घातले आहेत. अशी माहिती तपास मोहिमेचे नेतृत्व करणारे उपविभागीय पोलिस अधिकारी अभिजित धाराशिवकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. सर्जेराव पाटील, बार्शी शहरचे पो.नि. रामदास शेळके, तपासाधिकारी स.पो.नि. ज्ञानेश्वर उदार, फौजदार शामराव गव्हाणे, स.पौ.फो. वरपे, पोलिस अंमलदार माळी, भांगे, ठेंगल, पवार, घोंगडे, बारगीर, गोसावी, लगदिवे, सायबर शाखेचे रतन जाधव आदी तपासकार्यात सहभागी होते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
शुक्रवारी मध्यरात्री 3 नंतर चाटी गल्ली, महावीर मार्ग, तेलगिरणी चौक आदी भागातील सात दुकानांचे शटर उचकटून चोरट्यांनी सुमारे अडीच लाखाचा ऐवज लंपास केला होता. याबाबत ब्रँडलूट ब्रँडेड रेडीमेड गारमेंटस्चे गणेश भीमराव कानडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात आरोपींविरोधात शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता.
या गुन्ह्याचे काही दुकानांच्या सीसीटीव्ही मध्ये झालेल्या चित्रीकरणात चोरट्यांनी वापरलेली रिटझ कार दिसून आली होती. त्यानुसार सायबर शाखेच्या मदतीने पोलिसांनी ही कार ट्रॅक केली. या कारचा मागोवा घेतल्यानंतर हिस्ट्रीवरचे गुन्हेगार तपासले असता सदरील गुन्हा 1) मारुती चंद्रशेखर दासर 2) महेंद्र उर्फ मोट्या अविनाश पाटील दोघेही रा. हनुमान नगर, महापे, ठाणे बेलापूर नवी मुंबई 3) अभिजित गौतम कांबळे रा. सेक्टर 5, कोपरखैरणे, मयुर बारच्या समोर, नवी मुंबई 4) अजय अर्जुन कानगुलकर रा. सेक्टर नं. 23, गणेश पंचमी सोसायटी नवी मुंबई यांनी केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी लागलीच त्यांच्या पत्त्यावर जावून त्यांना अटक केली. या आरोपींनी बार्शीत दुकाने फोडल्याची कबूली दिली आहे. मात्र त्यांच्याकडून अजून कोणताही मुद्देमाल जप्त झालेला नाही.